अभिजीत दीपकेंना नवा पर्याय? मक्खी जनता पार्टीचे 72 तासात 3 लाख फॉलोअर्स; माशांनी उडवली झोप
मक्खी जनता पार्टी (MJP) सरन्यायाधीशांच्या टिप्पणीनंतर जन्माला आली. इन्स्टाग्रामवर 72 तासात 3.3 लाख फॉलोअर्स मिळवून ती व्हायरल झाली आहे. या पक्षाचा संस्थापक आर्यन नावाचा विद्यार्थी असून त्याची ओळख अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे तो अभिजीत दीपकेंना पर्याय ठरेल की पूरक काम करेल, याबद्दल उत्सुकता आहे. हा नवा पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात काय भूमिका घेईल, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

कॉकरोच जनता पार्टीनंतर आता मक्खी जनता पार्टीची एन्ट्री झाली आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी माशा मारण्यासाठी हातोडा वापरता येत नाही, असा वाकप्रचार वापरला होता. त्यानंतर सोशल मीडियावर लगेचच मक्खी जनता पार्टीची स्थापना करण्यात आली आहे. या पार्टीला जेनजीचा चांगला प्रतिसादही मिळाला आहे. त्यामुळे अभिजीत दीपकेंना नवीन पर्याय मिळाला की या नव्या पक्षाचा संस्थापक दीपकेंना पुरक काम करणार? अशी चर्चा या निमित्ताने रंगली आहे.
मक्खी जनता पार्टी (एमजेपी)च्या दाव्यानुसार 72 तासात इन्स्टाग्रामवर 40 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत. तर 3.3 लाखाहून अधिक फॉलोअर्स झाले आहे. या संघटनेच्या पेजवर आर्यन नावाचा विद्यार्थी या संघटनेचा संस्थापक असल्याचं दिसून येत आहे. आम्ही संघटनेच्या प्रवक्त्याच्या शोधात आहोत, असं या संघटनेच्या इन्स्टाग्रामच्या स्टोरीत म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे अकाऊंट जून 2021 मध्ये बनवण्यात आलं होतं. आता त्याचं नाव ‘makhijantaparty.ig’ करण्यात आलं आहे. या पूर्वी या पेजचं नाव आठवेळा बदलण्यात आल्याचंही दिसून आलं आहे.
सीजेआयची टिप्पणी अन्…
सरन्यायाधीश सूर्यकांत तीन दिवसांपूर्वी केलेल्या टिप्पणीनंतर या पक्षाची स्थापना झाली आहे. 9 ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीवेळी सूर्यकांत यांनी ही टिप्पणी केली होती. 10 ऑक्टोबर रोजी सीजेपीचं दिल्लीत आंदोलन होणार होतं. त्यानिमित्ताने सरकारने मेट्रो आणि रेल्वे बंद ठेवल्या होत्या. तसेच रस्तेही बंद केले होते. जागोजागी बॅरिकेड्स लावण्यात आल्या होत्या. त्याला विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात आली होती. त्यावरील सुनावणीवेळी भाष्य करताना सूर्यकांत यांनी ही टिप्पणी केली होती. नागरिकांची सुरक्षा करणं हे सरकारचं काम आहे. लोकांना त्रास होईल, असा निर्णय घेऊ नये. माशी मारण्यासाठी हातोड्याचा वापर करू नका, असं कोर्टाने म्हटलं होतं.
त्यावर एमजेपीने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. माश्या मारण्यासाठी हातोड्याचा वापर करता येत नाही, असं सरन्यायाधीश म्हणाले होते. आता तर माशीही म्हणले, आम्ही कुणापेक्षा कमी नाही, अशी कमेंट एमजेपीने केली आहे. दरम्यान, या पार्टीचा संस्थापक म्हणून आर्यन नावाच्या विद्यार्थ्याचं नाव आहे. हा आर्यन कोण आहे? काय करतो? तो कुठल्या राज्यातील आहे, याची माहिती समोर आलेली नाही. त्याची सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमीही समोर आलेली नाही. तो अभिजीत दीपकेंना पर्याय म्हणून काम करणार आहे की अभिजीत यांना पूरक काम करणार आहे हे सुद्धा अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे आर्यन नेमका कोण आहे? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.