ममतांच्या मदतीला पवार, प्रचारही करणार?

| Updated on: Dec 21, 2020 | 6:30 PM

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन करुन भाजपची तक्रार केली आहे (Mamata banerjee call Sharad Pawar).

ममतांच्या मदतीला पवार, प्रचारही करणार?
शरद पवार आणि ममता बॅनर्जी
Follow us on

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन करुन भाजपची तक्रार केली आहे (Mamata banerjee call Sharad Pawar). भाजप केंद्र सरकारच्या मदतीने बंगालच्या राज्य सरकारच्या अधिकारांचं हनन करुन तृणमूल काँग्रेसचे सरकार पाडण्याचे षडयंत्र रचत आहे, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी शरद पवार यांच्यासोबत फोनवर बोलताना केला आहे. ममता बॅनर्जींच्या या तक्रारीनंतर शरद पवार पश्चिम बंगालमध्ये जाणार, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

“कायदा आणि सुव्यवस्था हा विषय राज्य सरकारचा असताना केंद्र सरकार हस्तक्षेप करत अधिकार्‍यांना बदलण्याचे काम करत आहे. हा विषय गंभीर असून याविषयासंदर्भात तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाली. गरज पडल्यास पश्चिम बंगालमध्ये पवारसाहेब जातील”, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.

“ममता बॅनर्जी यांची भेट घेतल्यानंतर शरद पवार येत्या काही दिवसात सर्व पक्षांशी दिल्लीत चर्चा करून एकजूट करण्याचा प्रयत्न करतील”, असंदेखील नवाब मलिक यांनी सांगितलं (Mamata banerjee call Sharad Pawar).

“भाजप केंद्र सरकारचा दुरुपयोग करून निवडून आलेल्या सरकारांचे अधिकार काढून घेण्याचा आणि त्यांना पाडण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही. या विषयावर शरद पवार यांची ममता बॅनर्जी आणि अन्य नेत्यांशी चर्चा झाली आहे. नक्कीच रणनीती ठरवून पुढे काम केले जाईल”, असंही नवाब मलिक म्हणाले.

अमित शाहांचा बंगाल दौरा, आगामी निवडणूक आणि तृणमूल काँग्रेस

पुढच्या काही महिन्यांमध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने बंगालमध्ये शड्डू ठोकला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा काही दिवसांपूर्वी बंगाल दौऱ्यावर गेले होते. मात्र, तिथे त्यांच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. सुदैवाने या हल्ल्यात ते बचावले होते. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून चौकशी सुरु आहे. या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बंगालचा दौरा केला.

भाजपमध्ये मोठ्या नेत्यांचा प्रवेश, अमित शाहांच्या रॅलीत गर्दी

बंगालच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी दोन दिवसाचा बंगाल दौरा केला. या दौऱ्याला बंगाली नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यांच्या प्रचारसभेत प्रचंड गर्दी होती. या दौऱ्यादरम्यान तृणमूल काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे ममता बॅनर्जींना मोठा झटका बसला आहे.

शरद पवार बंगालमध्ये प्रचारासाठी जाणार?

बंगालमध्ये भाजप ज्याप्रकारे रणनीती आखत आहे ते पाहता तृणमूल काँग्रेसदेखील तयारीला लागली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी शरद पवार यांना बंगालमध्ये प्रचाराचं निमंत्रण देखील देऊ शकतात. त्यामुळे शरद पवार तृणमूल काँग्रेसच्या प्रचारासाठी बंगालमध्ये जाऊ शकतात, असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवला जात आहे.

हेही वाचा : महाराष्ट्रात उद्यापासून रात्रीची संचारबंदी, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय