तिसऱ्या मजल्यावर घेरलं, बेदम मारलं अन् पायऱ्यांवरून पळाले; मणिपुरी संगीतकाराच्या हत्येचा CCTV व्हिडीओ समोर

चोंगथम विक्रम सिंह कचरा टाकण्यासाठी तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमधून खाली गेले. काहीजण गोंधळ घालत असल्याने त्यांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र आठ जणांच्या गटाने त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर हल्ला केला.

तिसऱ्या मजल्यावर घेरलं, बेदम मारलं अन् पायऱ्यांवरून पळाले; मणिपुरी संगीतकाराच्या हत्येचा CCTV व्हिडीओ समोर
मणिपूरचे प्रसिद्ध गिटारवादक चोंगथम विक्रम सिंह यांचा मृत्यू
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 08, 2026 | 1:16 PM

दिल्लीतील संगीतविश्वातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मणिपूरचे प्रसिद्ध गिटारवादक चोंगथम विक्रम सिंह यांचा मारहाणीत मृत्यू झाला. 55 वर्षीय विक्रम सिंह यांनी जवळपास दोन दशकं दिल्लीमध्ये संगीताला वाहून घेतलं होतं. मात्र, रविवारी रात्री घराबाहेर झालेल्या वादानंतर झालेल्या हल्ल्यात त्यांचा जीव गेला. ते भारतातील पहिल्या ‘बाफ्ता’ BAFTA पुरस्कार विजेत्या ‘बुंग’ चित्रपटाच्या दिग्दर्शिका लक्ष्मिप्रिया देवी यांचे चुलत भाऊ होते. रविवारी रात्री सुमारे 11 वाजताच्या सुमारास त्यांच्या घराबाहेर काहीजण गोंधळ घालत होते. हे आठ जण मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. हा गोंधळ थांबवण्यासाठी विक्रम सिंह खाली गेले. काही वेळाने कुटुंबीयांना त्यांचा दरवाजा ठोठावत मदतीसाठी आवाज देताना ऐकू आलं.

त्यांचा 20 वर्षीय मुलगा यैफाबा खाली गेला असता विक्रम जवळपास बेशुद्धच पडले होते. त्यांच्या अंगावरील टी-शर्ट फाटलेला होता. त्यांना तातडीने होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र, त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. रक्तदाब 50 mmHg पेक्षाही खाली गेल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. शस्त्रक्रिया करणंही शक्य नसल्याने सोमवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. विक्रम यांच्या पश्चात पत्नी ज्योत्सना आणि 20 वर्षीय मुलगा यैफाबा असा परिवार आहे.

पहा व्हिडीओ-

आठ जणांच्या गटाने त्यांचा तिसऱ्या मजल्यापर्यंत पाठलाग केला. त्यानंतर कॉरिडॉरमध्ये त्यांना ताब्यात घेतलं आणि मारहाण केली. मणिपूरचे माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनीही सिंह यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी करताना इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेज शेअर केलं आहे. या फुटेजमध्ये हल्ल्यानंतर आठ जण जिन्यावरून खाली उतरताना दिसत आहेत. ‘या घटनेसंदर्भात आता पुरावे समोर येत असल्याने मी दिल्ली पोलिसांना आवाहन करतो की त्यांनी जलद आणि योग्य कारवाई करावी, या प्रकरणाचा सखोल तपास करावा आणि लवकरात लवकर न्याय मिळेल याची खात्री करावी’, असं सिंग म्हणाले.

या घटनेनंतर दिल्लीतील ईशान्य भारतातील विद्यार्थी संघटना, मित्र आणि कुटुंबीयांनी सनलाइट कॉलनी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करत न्यायाची मागणी केली. मणिपुरी संघटनांनीही दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत मृतदेह मणिपूरला न नेण्याची भूमिका घेतली आहे. या घटनेने दिल्लीतील संगीतविश्वासह ईशान्य भारतातील समुदायातही तीव्र संताप व्यक्त होत आहे.

चोंगथम विक्रम सिंह यांचा जन्म मणिपूरमध्ये झाला. सुरुवातीच्या काळात त्यांनी मणिपूरमधील अनेक बँड्समध्ये लीड गिटारिस्ट म्हणून काम केलं. संगीतावरील प्रेमामुळे ते जवळपास 20 वर्षांपूर्वी दिल्लीला आले. इथे त्यांनी संगीत क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी स्वतःची म्युझिक स्कूल सुरू केली होती. याशिवाय घरातून विद्यार्थ्यांना संगीताचं प्रशिक्षण देण्यासोबतच ते दिल्ली स्कूल ऑफ म्युझिकमध्येही शिकवत होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us