गुजरातमधील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; 18 जणांचा दुर्दैवी मृत्यू

गुजरातमधील बनासकांठा इथल्या डीसा शहरात फटाक्यांच्या कारखान्यात सकाळी 9 वाजता स्फोट झाला. या स्फोटात 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अग्निशमन दलासह एसडीआरएफ टीम घटनास्थळी पोहोचली आहे.

गुजरातमधील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; 18 जणांचा दुर्दैवी मृत्यू
Fireworks Factory
Image Credit source: Tv9
| Updated on: Apr 01, 2025 | 3:32 PM

गुजरातमधील बनासकांठा इथल्या फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला आहे. या स्फोटात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारखान्यातील बॉयलरचा स्फोट झाला. ज्यावेळी हा स्फोट झाला, तेव्हा कारखान्यात 30 कामगार काम करत होते. स्फोटात जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी अग्निशमन दल आणि बचाव पथक पोहोचलं असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. डीसा हे बनासकांठामधील एक शहर आहे. आज (मंगळवार) सकाळी 9 वाजता फटाक्याच्या कारखान्यातून स्फोटाचा आवाज ऐकू आला. हा आवाज ऐकून आजूबाजूच्या परिसरातील लोक घटनास्थळी पोहोचले, तेव्हा कारखान्यातून आगीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या. या स्फोटाची माहिती तात्काळ अग्निशमन दल आणि एसडीआरएफ टीमला देण्यात आली.

या स्फोटानंतरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. स्फोटामुळे कारखान्याच्या आतील भिंतींना नुकसान झाल्याचंही व्हिडीओमध्ये दिसत आहे. कारखान्याचे टिनचे शेड जागोजागी विखुरलेले दिसत आहेत. धुराचे लोट उठताना दिसत आहे. हा स्फोट इतका मोठा होता की त्याचा आवाज दूरपर्यंत ऐकू आला, अशी माहिती स्थानिकांनी दिली.

पोलीस अधिकारी काय म्हणाले?

डीसा ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात कारखान्याच्या काही भागाचं मोठं नुकसान झालं आहे. काही लोक अजूनही ढिगाऱ्याखाली दबलेले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अपघातानंतर कारखान्याचा मालक फरार

ज्या कारखान्यात हा स्फोट झाला, त्याचं नाव दीपक ट्रेडर्स आहे. इथे फटाके बनवले जात होते. स्फोटाच्या घटनेनंतर कारखान्याचा मालक फरार झाला आहे. डीएम माहिर पटेलदेखील घटनास्थळी पोहोचले आहेत. या कारखान्याला फटाके बनवण्याचा परवाना मिळाला होता की नाही याची चौकशी केली जात आहे. या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गोदामाचा एक भाग कोसळला

डीसाच्या उपविभागीय दंडाधिकारी नेहा पांचाळ यांनी सांगितलं, फटाक्याच्या कारखान्यातील स्फोटामुळे तिथल्या गोदामाचा एक भाग कोसळला. अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. घटनास्थळावरून ढिगारा हटवण्याचं काम सुरू आहे. घटनेविषयीची माहिती मिळताच डीसा नगरपालिकेनं अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पाठवल्या आहेत. त्याचप्रमाणे कारखान्यातील आग विझवण्याचं काम सुरू आहे.