हिंदू संस्कृती जगाला संतुलित दृष्टिकोन देऊ शकते, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचं प्रतिपादन
लंडन येथील 'सेलिब्रेशन ऑफ वननेस' कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी संघाच्या 100 वर्षांच्या प्रवासावर भाष्य करत जागतिक ऐक्याचा संदेश दिला. आपलेपणा, निःस्वार्थ सेवा आणि विविधतेचा आदर हाच हिंदू संस्कृतीचा मूळ स्वभाव असल्याचे स्पष्ट केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी लंडनमधील ‘सेलिब्रेशन ऑफ वननेस’ या कार्यक्रमात हजेरी लावली. संघाच्या 100 वर्षांच्या प्रवासावर भाष्य करताना त्यांनी विविध जागतिक विषयांवर संघाची भूमिका स्पष्ट केली. “जग अधिक सुंदर आणि समृद्ध बनवायचे असेल, तर आपल्याला विभागणाऱ्या गोष्टींपेक्षा एकत्र आणणाऱ्या गोष्टींवर अधिक भर दिला पाहिजे.”, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. ‘हिंदू स्वयंसेवक संघ’द्वारे आयोजित या कार्यक्रमाला 326 संस्थांचे प्रतिनिधित्व करणारे सुमारे 600 मान्यवर उपस्थित होते. काळाच्या कसोटीवर संघाने कोणते तत्त्व टिकवून ठेवले? या प्रश्नाचे उत्तर देताना डॉ. मोहन भागवत म्हणाले, “ते तत्त्व म्हणजेच ‘आपलेपणा’. हिंदूचा मूळ स्वभावच व्यक्ती, समाज आणि संपूर्ण मानवजातीवर निःस्वार्थ प्रेम करण्याचा आहे. हिंदू संस्कृती जगाला एक संतुलित दृष्टिकोन देऊ शकते.”
डॉ. मोहन भागवत पुढे म्हणाले की, हिंदू हा शब्द कोणत्याही विशिष्ट धार्मिक पद्धतीपुरता मर्यादित नाही. हिंदू हा एक स्वभाव आहे, जो सर्व प्रकारच्या विविधतेचा आदर करतो. विविध विचारसरणी आणि धार्मिक पद्धती या व्यापक हिंदू सांस्कृतिक चौकटीत एकत्र नांदू शकतात. भविष्यातील वाटचालीबाबत बोलताना सरसंघचालकांनी सांगितले की, सध्या संघात पाच पिढ्यांपासून काम सुरू आहे. सातव्या पिढीपूर्वी हिंदू समाजाला संघटित करण्याचे काम पूर्ण झाले पाहिजे, जेणेकरून हे काम पूर्ण होण्यास जास्त काळ लागणार नाही. सद्यस्थितीत लडाखपासून कन्याकुमारीपर्यंत स्वयंसेवक सक्रिय असून राजकीय विरोधकही त्यांच्या सेवाकार्याचा आदर करतात, असंही ते सांगायला विसरले नाहीत.
Link to the event “Celebration of Oneness” at London.
An immersive dialogue with Poojaneeya Sarsanghchalak Dr. Mohan ji Bhagwat. #CelebratingOneness https://t.co/rjqR5IpnG5— RSS (@RSSorg) September 6, 2026
ब्रिटनमध्ये राहणाऱ्या हिंदूंच्या निष्ठेबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी अत्यंत स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले, “एक सच्चा हिंदू असणे आणि ब्रिटनशी प्रामाणिक राहणे यात कोणत्याही संघर्षाचं कारण नाही. हिंदुत्वानुसार, तुमची निष्ठा तुमच्या कर्मभूमीशी असली पाहिजे.” तुमची निष्ठा तुमच्या ‘कर्मभूमी’शी असते. तुमची ‘जन्मभूमी’ आणि ‘पुण्यभूमी’ यातून तुम्हाला संस्कार मिळतात. त्या संस्कारांचे पालन तुम्हाला तुमच्या कर्मभूमीत करायचे असते आणि ज्या भूमीवर तुम्ही राहता, तिची सेवा करायची असते, असं मोहन भागवत म्हणाले. तरूणांना संदेश देताना भागवत यांनी पुढे सांगितले की, सेवा ही कोणत्याही उपकाराच्या किंवा दयेच्या भावनेतून न करता निःस्वार्थपणे केली पाहिजे.
या कार्यक्रमाची सुरुवात नेपाळमधील पूरग्रस्तांना श्रद्धांजली वाहून शांततेत करण्यात आली. या प्रसंगी ‘सेवा युके’ तर्फे नेपाळमधील मदतकार्यासाठी 1 लाख पाउंडचा मदत देण्यात आली.या कार्यक्रमाला ब्रिटनमधील हाऊस ऑफ लॉर्ड्सचे सदस्य, खासदार, महापौर आणि भारताचे उच्चायुक्त पेरियासामी कुमारन यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. डॉ. भागवत यांनी आपल्या लंडन दौऱ्यात विविध धर्मगुरू, शिक्षणतज्ज्ञ आणि विचारवंतांचीही भेट घेतली.