
अमेरिका, इराण आणि इस्त्रायलमध्ये भीषण युद्ध सुरू आहे, आज या युद्धाचा दहावा दिवस आहे. दरम्यान युद्धाच्या दुसऱ्याच दिवशी अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर भीषण हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यामध्ये इराणनचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्यासोबतच त्यांची मुलगी, नात जावई आणि इतरही काही बड्या सैन्य अधिकाऱ्यांचा या घटनेत मृत्यू झाला होता. दरम्यान अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणचा सर्वोच्च नेता आता कोण होणार? याची उत्सुकता सर्व जगाला होती. अखेर इराणकडून आपल्या सर्वोच्च नेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. अयातुल्ला अली खामेनेई यांचा मुलगा मोजतबा खामेनेई हे आता इराणचे नवे सर्वोच्च नेते बनले आहेत. मात्र इराणकडून आपल्या नव्या नेत्याची घोषणा होताच अमेरिकेचं टेन्शन वाढलं आहे.
इराणने आपल्या नव्या नेत्याची निवड अशावेळी केली जेव्हा इराण सध्या अमेरिका आणि इस्त्रायलसोबत एकाचवेळी यु्द्धामध्ये गुंतला आहे, न्यूयॉर्क टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार आता अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी देखील हे मान्य केलं आहे की, अमेरिकेनं जेवढा विचार केला होता, त्यापेक्षा कितीतरी अधिक ताकदीने इराणचे अमेरिका आणि इस्त्रायलवर हल्ले सुरू आहेत, जर अशीच परिस्थिती राहिली तर या युद्धामध्ये अमेरिकेचं प्रचंड नुकसान होऊ शकतं, असा इशारा अमेरिकेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे.
दरम्यान इराणने सर्वोच्च नेता म्हणून मोजतबा खामेनेई यांच्या नावाची घोषणा करताच अमेरिकेचं टेन्शन वाढलं आहे. सीआयएचे माजी प्रमुख डेव्हिड पेट्रेयस यांनी याबाबत बोलताना मोठं विधान केलं आहे. मोजतबा खामेनेई हे इराणचे प्रमुख होणं हे केवळ एकट्या अमेरिकेसाठीच नाहीतर संपूर्ण पाश्चिमात्य देशांसाठी चिंतेची गोष्ट असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मोजतबा हे आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवणार आहेत, त्यामुळे इराणच्या अणूऊर्जा धोरणात कोणताही बद होऊ शकणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान मोजतबा खामेनेई यांची निवड हा अमेरिकेसाठी इराणचा स्पष्ट संकेत असल्याचं या क्षेत्रातील जाणकरांनी म्हटलं आहे.