
Tahawwur Rana: मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा सध्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) कोठडीत आहे. एनआयए अधिकारी त्याची सतत कसून चौकशी करत आहे. शनिवारी दुसऱ्या दिवशी त्याची चौकशी झाली. या दरम्यान राणा याला अनेक प्रश्न विचारण्यात आले. एनआयए कोठडीत असलेल्या राणाने तीन वस्तूंची मागणी अधिकाऱ्यांकडे केली.
अधिकाऱ्याने सांगितले की त्याला कोणतीही विशेष वागणूक दिली जात नाही. अटक केलेल्या व्यक्तीला जशी वागणूक दिली जाते तशीच वागणूक त्याला दिली जात असल्याचे त्याने सांगितले. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणा याने कोठडीत तीन गोष्टींची मागणी केली. त्याने कुराण, पेन आणि कागदाची मागणी केली आहे. त्याच्या मागणीनंतर त्याला कुराणची प्रत देण्यात आली आहे. तो एजन्सी मुख्यालयात दररोज पाच वेळा नमाज अदा करत आहे. कुराण व्यतिरिक्त राणा याने पेन आणि कागदाची मागणी केली होती. ते ही त्याला देण्यात आले आहे. परंतु पेनच्या मदतीने त्याने स्वतःला इजा पोहोचवू नये म्हणून त्याच्यावर कडक देखरेख ठेवली जात आहे.
राणा याला त्याच्या वकिलाला भेटण्याची परवानगी आहे. तसेच दर ४८ तासांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. अमेरिकेतून राणाचे प्रत्यार्पण झाल्यानंतर त्याला १८ दिवसांच्या एनआयए कोठडीत दिली आहे. राणा गुरुवारी संध्याकाळी अमेरिकेहून भारतात आला. त्याला यूएपीए अंतर्गत अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर मुंबई दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे.
शुक्रवारी सकाळी त्याला एनआयए मुख्यालयात आणण्यात आले. तेव्हापासून तपास यंत्रणा त्याची सतत चौकशी करत आहे. चौकशीत तो सहकार्य करत नाही. अनेक गोष्टींना तो आठवत नाही, अशी उत्तरे देत आहे. त्याला त्याच्या परिवारासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. परंतु त्याची उत्तरे देणे तो टाळत होता.