
Narendra Modi Speech : यंदा संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चांगलेच वादळी ठरत आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या पुस्तकाचा आधार घेत चीनच्या घुसखोरीचा मुद्दा लावून धरला आहे. काँग्रेस तसेच इतर विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेत मोदी सरकारला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधकांच्या याच भूमिकेमुळे लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर मोदी यांचे भाषण होऊ शकले नाही. राज्यसभेत मात्र मोदींनी जोरदार भाषण करून विरोधकांचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी काँग्रेसची सत्ता असताना काय घडत होतं? हे सांगत सध्या भारताला जागतिक पातळीवर काय स्थान आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला. तसेच आम आदमी पार्टीच्या एका खासदाराच्या भाषणाचा मुद्दा उपस्थित करत शेरोशायरीच्या माध्यमातून आम आदमी पार्टीवरही जोरदार टीका केली.
राज्यसभेतील आपल्या भाषणात मोदी यांनी अमेरिका आणि भारत यांच्याीतल व्यापार करारावर भाष्य केले. या व्यापार करारामुळे संपूर्ण जगाचे लक्ष भारताने वेधले आहे. भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेन मार्गक्रमण करत आहे, असे मोदी म्हणाले. तसेच काँग्रेसच्या धोरणावर बोलताना, काँग्रेसमुळे भारताची जी प्रतीमा निर्माण झाली होती, ती पुसण्यासाठी मला कित्येक वर्ष लागली. काँग्रेसचे धोरण जाणून घ्यायचे असेल तर काँग्रेसच्या याआधीच्या माजी पंतप्रधानांची लाल किल्ल्यावरील भाषणं ऐका. या भाषणात कोणताही विचार नव्हता, कोणतीही दूरदृष्टी नव्हती तसेच कोणतीही इच्छाशक्ती नव्हती, असा आरोप मोदी यांनी केला.
आम आदमी पार्टीच्या एका खासदाराने आपल्या भाषणात मोदी सरकारच्या धोरणावर टीका केली. याच टीकेला मोदी यांनी शेरोशायरीच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले. आम आदमी पार्टी दिल्लीमध्ये सत्तेत असताना मद्य घोटाळ्याचे आरोप झाले. या आरोपांमुळे तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना तुरुंगात जावे लागले. हाच मुद्दा उपस्थित करता मोदी यांनी आप पक्षाला लक्ष्य केलं. ज्या लोकांचे सरकार मद्याच्या घोटाळ्यामुळे गेले त्या लोकांना मला सांगयचे आहे की, ‘तुम कितना दुनिया को धोखा दोगे… आईना देख लिया तो अपना सच्चाई कहां छिपाओगे,’ अशा ओळी म्हणत मोदी यांनी आप पक्षाला घेरलं. दरम्यान, मोदींनी आपल्या भाषणात पुढे भारताचा विकास, सरकारचे धोरण यावरही भाष्य केले.