कोरोनाबाधित आईनं बाळाला दूध पाजलं आणि पुढं जे घडलं ते काळीज पिळवटणारं

| Updated on: Apr 16, 2021 | 4:48 PM

गुजरातच्या सूरत शहरात कोरोनाने अवघ्या 14 दिवसांच्या चिमुकलीचा बळी घेतला आहे (14 day old girl death due to corona in Surat).

कोरोनाबाधित आईनं बाळाला दूध पाजलं आणि पुढं जे घडलं ते काळीज पिळवटणारं
Follow us on

सूरत (गुजरात) : कोरानाने आता प्रचंड आक्राळविक्राळ रुप धारण केलं आहे. हा विषाणू आता नुकत्याच जन्माला आलेल्या लहान मुलांनाही सोडत नाहीय. गुजरातच्या सूरत शहरात कोरोनाने अवघ्या 14 दिवसांच्या चिमुकलीचा बळी घेतला आहे. डॉक्टरांनी चिमुकलीला वाचवण्याचा प्रचंड प्रयत्न केला. मात्र, त्यांचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले आणि चिमुकलीचा मृत्यू झाला. या मुलीला जन्मानंतर दोन दिवसातच कोरोनाची लागण झाली होती. तिच्यावर प्लाझ्मा थेरपीचा देखील वापर करुन उपचार करण्यात आले. मात्र, तरीही तिचा प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं नाही (14 day old girl death due to corona in Surat).

आईच्या चुकीमुळे चिमुकलीला कोरोनाची लागण

सूरतच्या वराछा येथील डायमंड रुग्णालयात चिमुकलीवर उपचार सुरु होते. चिमुकलीच्या आईला आधीपासूनच कोरोनाची लक्षणे जाणवत होती. मात्र, तिने याकडे दुर्लक्ष केले. याशिवाय तिने कुणालाही सांगितलं नाही. मुलगी जन्माल्यानंतर तिने मुलीला दूध पाजलं. मात्र, तिच्या या चुकीमुळे नुकत्याच जन्माला आलेल्या मुलीच्या आरोग्यावर वाईट परिणाम झाला. जन्मानंतर अवघ्या दोन दिवसात तिला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर तिला डायमंड रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

सूरतमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत तीन चिमुकल्याचं निधन

या घटनेनंतर संपूर्ण शहर सुन्न झालं आहे. सूरतमध्ये लहान मुलांना कोरोनाच्या लागण होण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. सूरतमध्ये गेल्या 30 दिवसात 10 वर्षांखालील 286 लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. तर आतापर्यंत तीन लहान चिमुकल्यांचा दुर्दैवी कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे चिंता वाढली आहे. कोरोनाची दुसरी लाट ही लहान मुलांसाठी जास्त धोकादायक असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात येतंय (14 day old girl death due to corona in Surat).

देशात कोरोनाचा हाहा:कार

देशात कोरोनाबाधितांचा आकडा प्रचंड प्रमाणात वाढत आहे. दिवसभरात तब्बल दोन लाखांच्या घरात नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळताना दिसत आहे. कोरोनाचा हा आकडा असाच वाढत राहिला तर पुढच्या काही दिवसात जास्त भीषण परिस्थिती उद्भवण्याची भीती वर्तवली जात आहे. महाराष्ट्रात तर सध्या भीषण परिस्थिती आहे. अनेक शहरांमध्ये रुग्णांना बेड मिळणं कठीण होऊन बसलं आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतोय. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील आव्हानं दिवसेंदिवस वाढत आहेत.

हेही वाचा : स्मशानभूमीत अनेक ठिकाणी शवदाहिन्या बंद, मृतदेहांना घेऊन नातेवाईक तासंतास रांगेत, कल्याण डोंबिवलीतील भयाण वास्तव