
मुलीचं लग्न होतंय म्हणून आई – वडील प्रचंड आनंदी असतात, तर दुसरीकडे आपली आता आपल्याला सोडून सासरी जाणार याविचाराने आई – वडील दुःखी असतात. आपल्या मुलीचा संसार सुखाचा राहण्यासाठी आई वडील वाटेल तो त्याग करण्यासाठी तयार होतात. पण सासरच्या जाचाला कंटाळून मुलगी आयुष्य संपवते आणि आई – वडिलांना पूर्ण विश्व संपल्यासारखं लाटतं. वैष्णवी हगवणे हिच्यानंतर 27 वर्षीय नवविवाहितेने आयुष्य संपवलं आहे.
तामिळनाडूतील तिरुपूर येथे एका 27 वर्षीय नवविवाहित महिलेने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे, जिचं नुकताच लग्न झालं होतं. या आत्महत्येमागे हुंड्याचा छळ हे कारण असल्याचे सांगितलं जात आहे. मृतक महिलेचं नाल रिधान्या असं आहे. रिधान्या ही कपडे व्यापारी अन्नादुरई यांची मुलगी आहे. रिधान्याचं लग्न एप्रिलमध्ये काँग्रेस नेते कृष्णन यांचे 28 वर्षीय नातू कविनकुमार याच्यासोबत झालं होतं. आत्महत्या करण्यापूर्वी रिधान्याने तिच्या वडिलांना व्हॉट्सअॅप मेसेज पाठवून तिच्या पती आणि सासरच्या लोकांवर छळाचा आरोप केला होता.
स्थानिक तमिळ माध्यमांनुसार, रविवारी रिधान्या मोंडीपलायम येथील मंदिरात जाण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडली. तिने प्रथम थलकराई लक्ष्मी नरसिंह पेरुमल मंदिराचं दर्शन घेतलं आणि नंतर सेयूर येथून कीटकनाशक विकत घेतलं. त्यानंतर मोंडीपलायम पेरुमल मंदिरात जाताना तिने तिच्या कारमध्ये ते सेवन केले.
बराच काळ कार एकाच ठिकाणी उभी असल्याचं लक्षात येताच स्थानिकांनी पोलिसांना कळवलं. त्यानंतर पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले आणि कारमध्ये पोलिसांना रिधान्या मृत अवस्थेत आढळली.
विष सेवन करण्याआधी रिधान्या हिने वडिलांना 7 ऑडिओ मेसेज पाठवले. ज्यामध्ये रिधान्या हिने टोकाचं पाऊल उचलत असल्यामुळे आई – वडिलांची माफी मागितली. मेसेजमध्ये रिधान्या हिने तिच्या पती आणि सासरच्यांवर मानसिक आणि शारीरिक छळाचा आरोप केला आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, अन्नादुराई यांना त्यांच्या मुलीच्या छळाची माहिती होती. वेळेनुसार सर्वकाही ठिक होईल असं ते सतत मुलीला सांगत होते. आता पोलिसांनी पती कविन कुमार, सासरे ईश्वरमूर्ती आणि सासू चित्रादेवी यांना अटक केली आहे.
वडिलांना ऑडिओ मेसेज पाठवत रिधान्या म्हणाली, ‘माझ्या भोवती प्रत्येक जण नाटक करत आहे. तरी देखील मी गप्प का आहे मला कळत नाही. मी अशी का झाली आहे मला माहिती नाही. मला आयुष्यभर तुमच्यावर ओझ म्हणून राहायचं नाही… मला माझं हे आयुष्य आवडत नाही. मला मानसिक आणि कविन शारीरिक त्रास देत आहे. मला असं आयुष्य नकोय. तुम्ही आणि आई माझं संपूर्ण आयुष्य आहात.. मला माफ करा बाबा… सर्वकाही संपलं आहे मी जात आहे…’
11एप्रिल रोजी झालेल्या मुलीच्या लग्नावर कापड उद्योगपती अन्नादुराई यांनी 2.5 कोटी रुपये खर्च करून एक भव्य सोहळा साजरा केला. मुलीच्या लग्नात त्यांनी हुंडा म्हणून 100 सोन्याची नाणी, 70 लाख रुपयांची आलिशान कार दिली होते. 200 नाणी काही दिवसांनी देण्याचं वचन वडिलांनी सासरच्या मंडळींना दिलं होतं. पण, लग्नानंतर अवघ्या 10 दिवसांतच, सासरच्यांनी तिच्यावर 200 नाण्यांसाठी दबाव आणण्यास सुरुवात केली; तिचा अपमान आणि छळ करण्यात आला. सतत होणाऱ्या छळाला कंटाळून अखेर रिधान्या हिने आयुष्य संपवलं.