
नर्स निमिषा प्रिया सध्या येमेनची राजधानी सना येथील जेलमध्ये कैद आहे, तिला हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आलं आहे. निमिषा प्रिया हिने आपला मित्र अब्दो महदी याची हत्या केल्याचा तिच्यावर आरोप आहे, या प्रकरणात तिला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तिला येत्या 16 जुलै रोजी फाशी देण्यात येणार आहे. तिला वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र निमिषा प्रियासंदर्भात दोन मोठ्या बातम्या समोर आल्या आहेत आणि या बातम्यांमुळे चिंता वाढली आहे.
पहिली बातमी भारतामधून समोर आली आहे, ती म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीदरम्यान हे स्पष्ट झालं आहे की, आता निमिषाचा जीव फक्त ब्लड मनीमुळेच वाचू शकतो, तर दुसरी मोठी बातमी म्हणजे निमिषावर ज्या व्यक्तीच्या हत्येचा आरोप आहे, त्याच्या कुटुंबानं ब्लड मनी घेण्यास नकार दिला आहे. निमिषाचं कुटुंब ब्लड मनी म्हणून महदीच्या कुटुंबाला एक मिलियन डॉलर देण्यास तयार आहे, मात्र अब्दो महदीचं कुटुंब हे पैसे घेण्यास तयार नसल्याची बातमी समोर आली आहे. अब्दो महदी हा निमिषाचा बिजनेस पार्टनर देखील होता.
2017 ला निमिषावर तिचा बिझनेस पार्टनर असलेल्या अब्दो महदीच्या हत्येचा आरोप करण्यात आला होता, त्यानंतर तिला अटक करण्यात आलं, ती सध्या येमेनची राजधानी असलेल्या सना येथील जेलमध्ये असून या प्रकरणात तिला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. येत्या 16 जुलै रोजी तिला फाशी देण्यात येणार आहे.
पीटीआकडून मिळालेल्या वृत्तानुसार निमिषा प्रियाच्या कुटुंबाकडून आणि तिच्या वकिलांकडून अब्दो महदी यांच्या कुटुंबानं ब्लड मनीचा स्वीकार करावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्याच्या कुटुंबानं ब्लड मनी स्विकारण्यास नकार दिला आहे. दुसरीकडे सना जेलच्या अधिकाऱ्यांनी निमिषाच्या फाशीची तयारी सुरू केली आहे, 16 जुलै रोजी सकाळपर्यंत तिला फाशी दिली जाईल असं त्यांनी म्हटलं आहे. ब्लड मनीमुळे तिचा जीव वाचू शकतो, मात्र महदीच्या कुटुंबानं ब्लड मनी स्विकारण्यास नकार दिल्याची बातमी आहे.