काँग्रेस खासदाराच्या घरात सापडलेल्या नोटाच नोटा, खासदाराला निलंबित करण्याची भाजपची मागणी

काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या घरातून सुमारे 290 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहे. अजूनही ७ खोल्या बाकी आहेत. त्यामुळे ही रक्कम आणखी वाढू शकते. भाजपने हा मुद्दा लावून धरला आहे. देशभरात काँग्रेस विरोधात निदर्शन करण्यात आली. भाजपने काँग्रेस खासदाराला राज्यसभेतून निलंबित करण्याची मागणी केली आहे.

काँग्रेस खासदाराच्या घरात सापडलेल्या नोटाच नोटा, खासदाराला निलंबित करण्याची भाजपची मागणी
| Updated on: Dec 09, 2023 | 8:34 PM

Income tax Raid : भारतीय जनता पक्षाने आज दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेसविरोधात जोरदार निदर्शने केली. भाजप खासदार आणि भोजपुरी स्टार मनोज तिवारी यांच्यासह अनेक नेते दिल्लीत निदर्शनात सहभागी झाले होते. या सर्व नेत्यांनी काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्याकडून 290 कोटींहून अधिक रोख रक्कम जमा केली आहे. अजूनही ७ खोल्या आणि ९ लॉकर उघडणे बाकी असल्याची माहिती पुढे येत आहे. काळा पैसा मिळाल्याच्या निषेधार्थ काँग्रेसविरोधात भाजपकडून घोषणाबाजी करण्यात आली. धीरज साहू यांना राज्यसभेतून निलंबित करण्याची मागणीही भाजप नेत्यांनी केली.

आंदोलनादरम्यान दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा म्हणाले की, राहुल गांधींनी चौकीदार चोर असा नारा दिला होता, पण आता चोर कोण ते सांगा. काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या घतातून मोठी रोकड जप्त केल्यानंतर भाजपने या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेतला आहे. काँग्रेस पक्षाला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे.

भाजपचे खासदार मनोज तिवारी म्हणाले की, काँग्रेस खासदाराच्या घरातून जप्त केलेला पैसा हा गरिबांचा होता आणि त्यातून रोजचा पैसा काँग्रेस नेतृत्वाकडे येत होता. भाजप खासदार रमेश बिधुरी म्हणाले की, जेव्हा-जेव्हा विरोधी खासदारांवर ईडीची कारवाई होते, तेव्हा काँग्रेस आणि विरोधी पक्ष असे म्हणायचे की, विरोधकांचा आवाज दाबण्याचे षडयंत्र रचले जात आहे. आता ईडीची कारवाई योग्य होती की अयोग्य हे स्पष्ट झाले आहे.

दिल्ली सोडून इतर राज्यात निदर्शने

दिल्लीतील या आंदोलनात भाजप खासदार मनोज तिवारी, प्रवेश वर्मा, रमेश बिधुरी, दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा, दिल्लीचे विरोधी पक्षनेते रामवीर सिंह बिधुरी यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते. दिल्लीशिवाय इतर अनेक राज्यांतही भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसविरोधात निदर्शने केली.

काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या झारखंड आणि ओरिसातील वेगवेगळ्या ठिकाणांहून 250 कोटींहून अधिक रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. आयकर विभागाच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात अजूनही नोटांची मोजणी सुरू आहे.