काँग्रेस खासदाराच्या घरात सापडले घबाड, पैसे मोजण्यासाठी लागणार आणखी 2 दिवस
Income Tax Raid : काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या घरातून आतापर्यंत 290 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. 7 खोल्या आणि 9 लॉकर्सचा शोध घेणे अजून बाकी असल्याचे कळते आहे. त्यामुळे अजूनही कारवाई सुरुच राहणार आहे. पैसे मोजण्यासाठी आणखी दोन दिवस लागू शकतात. नोटा मोजण्यासाठी 40 मशीन ठेवण्यात आल्या आहे

नवी दिल्ली : ६ डिसेंबर रोजी आयकर विभागाने काँग्रेस खासदार धीरज साहू ( Dheeraj Sahu ) यांच्या घरावर छापा टाकला. छाप्याची छायाचित्रे समोर आल्यावर ती बँकेची तिजोरी आहे की घरची असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला. खासदार धीरज साहू यांच्या घरातून इतका काळा पैसा बाहेर आला की नोटा मोजण्यासाठी ४० मशीन वापरावी लागली. तरी देखील अजूनही मोजणी सुरुच आहे. आतापर्यंत 290 कोटी रुपयांची रोकड सापडली आहे. हा आकडा अजून वाढणार आहे.
अजूनही अनेक खोल्या आणि लॉकर उघडणे बाकी असल्याची माहिती पुढे येत आहे. 7 खोल्या आणि 9 लॉकर्सवर छापे टाकणे अजून बाकी आहे. आयकर विभागाची ही कारवाई आतापर्यंतची सर्वात मोठी छापेमारी असून यामध्ये सर्वाधिक रोकड जप्त करण्यात आली आहे. देशातील कोणत्याही कंपनी किंवा तिच्याशी संबंधित संस्थांवर टाकलेल्या या छाप्यात सर्वाधिक रोख रक्कम सापडली आहे. खुद्द पीएम मोदींनीही याबाबत सोशल मीडियावर ट्विट केले होते.
सर्वाधिक 500 रुपयांच्या नोटा
आतापर्यंत जप्त करण्यात आलेल्या रोकडमध्ये 500 रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. नोटा मोजण्यासाठी बँक कर्मचारी आणि एजन्सीचे अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. पैसे मोजण्यासाठी आणखी दोन दिवस लागतील, असे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत मिळालेली रोकड बँकेत नेण्यासाठी अनेक वाहने तैनात करण्यात आली आहेत.
तीन सूटकेसमध्ये दागिने
ही रक्कम ओडिशातील बोलंगीर जिल्ह्यातील बलदेव साहू आणि ग्रुप ऑफ कंपनीजच्या मद्य कंपनीच्या आवारात ठेवण्यात आली होती. 230 कोटी रुपये 8 ते 10 कॅबिनेटमध्ये ठेवण्यात आले होते. त्याच वेळी, उर्वरित पैसे ओडिशा आणि रांचीमधील इतर ठिकाणांहून जप्त करण्यात आले आहेत. धीरज साहू यांच्या घरातून बाहेर पडताना प्राप्तिकर विभागाच्या पथकाने तीन सुटकेस घेतल्या. त्यात दागिनेही असल्याचे समजते. मात्र, याची पुष्टी झालेली नाही.
आयकर अधिकारी सध्या कंपनीचे विविध अधिकारी आणि त्याच्याशी संबंधित लोकांचे जबाब नोंदवत आहेत. 7 खोल्या आणि 9 लॉकर्सची झडती घेणे बाकी आहे, जिथे रोख रक्कम आणि दागिने सापडू शकतात अशी माहिती आहे.
