Bhandup Bus Accident : घरी जाण्याची लगबग, बसची लाईन आणि किंकाळ्या.. रिव्हर्स घेताना आक्रीत घडलं, भांडूप अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर !
भांडूप येथे बेस्ट इलेक्ट्रिक बस अपघातात 4 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले. रात्री 10 च्या सुमारास घडलेल्या या दुर्दैवी घटनेचे थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यात बसवरील नियंत्रण सुटल्याने गर्दीत घुसल्याचे स्पष्ट दिसत आहे. मुख्यमंत्र्यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली असून, त्यांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. चालकाला ताब्यात घेण्यात आलं असून पोलिस त्याची चौकशी करत आहेत.

रात्रीची वेळ, किरर्र अंधार, वातावरणात वाढलेला गारवा आणि दिवसभराचं काम आटपून, पिट्ट्या पडल्याने घरी परतणाऱ्या लोकांची लगबग.. मुंबईतील कोणत्याही रेल्वे स्टेशनच्या परिसरात रात्रीच्या सुमारास हेच दृश्य दिसतं. भांडूप स्टेशनला सोमवारची रात्रही तशीच होती, आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने अनेकांचा ऑफीसमधल्या कामाने जीव शाणलेला, रात्री 10 वाजले तरी कामावरून परतणाऱ्यांची लगबग सुरू होती. मात्र तेवढ्यात अचानक नको ते घडलं. अनेक प्राशांना यइथून तिथेन सुखरूप पोहोचवणारी इलेक्ट्रिक बस काळ बनून आली आणि क्षणार्धआत सगळंच बदललं. स्टेशन रोड परिसरात धावणाऱ्या BEST च्या इलेक्ट्रिक बसखाली चिरडून काल 4 निष्पाप नागरिकांनी जीव गमावला तर 13-14 जखमींपैकी अनेक जण रुग्णालयात असून काही जण मृत्यूशी झुंज देत आहेत. संपूर्ण मुंबई हादरवणाऱ्या आणि कुर्ला बस अपघाताच्या दुर्दैवी घटनेची आठवण करून देणाऱ्या या भांडूप अपघाताचे धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. त्यातील धडकी भरवणारी दृश्य पाहून कोणत्याही माणसाच्या जीवाचा थरकाप उडेल.
अपघातामुळे अफरातफरी, एकच कल्लोळ
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्रीच्या 10 च्या सुमारास हा दुर्दैवी आणि तितकाच धक्कादायक प्रकार घडला. रात्र चढत आली तरी भांडूप स्टेशन गजबजलेलं होतं, अनेक लोकं रेल्वे प्रवासाने थकून भागून आले होते आण घराच्या दिशेन चालत निघाले होते. तर काही जण बसची वाट पहात लाईनमध्ये उभे होते. मात्र तेवढ्यात किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. भांडुप पश्चिमेला स्टेशन रोडजवळ वर्दळीच्या ठिकाणी बेस्टची इलेक्ट्रिक बस रस्त्यावर होती, त्याचा चालक ही बस रिव्हर्स घेत होता, मात्र तेवढ्यात अचानक त्याचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि अघटित घडलं. त्या बसच्या मागे असलेले अनेक नागरिक त्याखाली चिरडले गेले. सुमारे 13 जण गंभीर जखमी झाले. त्यात 4 जणांचा मृत्यू झाला, उर्वरित जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
भांडुप बस अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर
भांडूप स्टेशनजवळ ही इलेक्ट्रिक बस वळत होती, तेवढ्यात चालकाचे नियंत्रण सुटलं. नियंत्रित बस गर्दीत घुसली आणि रस्त्यावर जो दिसेल त्याला धडकली. अनेकजण तर बसला धडकून खाली कोसळले आणि चाकाखाली चिरडले गेले. त्यामुळे काही जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. एवढंच नव्हे तर बस पुढे जाऊन एका लोखंडी खांबालाही धडकली, त्यामुळे तो खांब वाकल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताच्या वेळी स्टेशनबाहेर मोठी गर्दी होती. वळण घेताना अचानक नियंत्रण गमावून बसने अनेक लोकांना धडक दिली असं प्रत्यक्षदर्शींनीदेखील सांगितलं.
चालक पोलिसांच्या ताब्यात
या थरारक पण तेवढ्याच दुर्दैवी अपघाताचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. अपघात स्थळाजवळील एका कपड्यांच्या दुकानात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली. त्या फुटेजमध्ये स्पष्ट दिसतं की काही प्रवासी रस्त्याच्या कडेला उभे होते. नियंत्रण गमावल्याने ती इलेक्ट्रिक बस अचानक मागे येऊ लागली, ते पाहून अनेक जण भांबावले, जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळू लागले. काही लोक यशस्वी झालेही, पण इतर अपयशी ठरले. काहींना बसची धडक बसून ते जखमी झाले, तर काहीजण धडक बसल्यावर थेट खाली कोसळले आणि चाकाखाली चिरडले गेले. भांडूप स्थानकात एकच गोंधळ, किंकाळ्या, आरडाओरडा ऐकायला येत होता.
दरम्यान पोलिसांनी त्या बसच्या चालकास ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. तो चालक नवीन होता की अनुभवी? बसमध्ये काही तांत्रिक बिघाड होता का? बस चालवताना त्याने मद्यप्राशन केले होते का अशा अनेक बाबींचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक, 5 लाखांची मदत जाहीर
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भांडूप अपघाताबद्दल शोक व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच राज्य सरकारतर्फे मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल असेही त्यांनी जाहीर केलं.
मुंबईतील भांडूप रेल्वे स्थानकानजीक झालेल्या एका दुर्दैवी अपघातात 4 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेत 9 जण जखमी झाले असून त्यांना लवकर बरे वाटावे, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये…
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 29, 2025
