International Yoga day : नव्या योग इकोनॉमी बद्दल पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

International Yoga day : आज आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. दरवर्षी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. भारतानेच आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रात मांडला होता. 177 देशांनी या प्रस्तावाच समर्थन केलं होतं.

International Yoga day : नव्या योग इकोनॉमी बद्दल पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
PM Modi International Yoga Day
| Updated on: Jun 21, 2024 | 8:49 AM

आज 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7000 लोकांसमवेत डल लेकच्या किनारी श्रीनगरमध्ये योगा केला. त्याआधी त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं. काश्मीरच्या भूमीवरुन पीएम मोदींनी 10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. “जम्मू-काश्मीर योग साधनेची भूमी आहे. योगाचा हा अविरत प्रवास सुरु आहे” असं पंतप्रधान मोदी म्हणाले. “जगात योग करणाऱ्यांची संख्या वाढतेय. जगातील अनेक देशात योग दिनचर्येचा भाग बनतोय. सौदी अरेबियात योगाचा एज्युकेशन सिस्टिममध्ये समावेश करण्यात आलाय” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

“जगात योगावर रिसर्च सुरु आहे. जगातील नेते आता योगावर बोलत आहेत. योगामुळे समाजात बदल घडतोय” असं पीएम मोदी म्हणाले. “2014 साली मी संयुक्त राष्ट्रात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव ठेवला होता. भारताच्या या प्रस्तावाच 177 देशांनी समर्थन केलं. हा एक रेकॉर्ड होता, तेव्हापासून योग दिनी नवीन रेकॉर्ड प्रस्थापित होतोय” असं पीएम मोदी म्हणाले.

‘एकाग्रता मानवी मनाची मोठी ताकद’

पंतप्रधान मोदी म्हणाले की, “यावर्षी भारतात फ्रान्सच्या 101 वर्ष वयाच्या योग टीचर असलेल्या महिलेला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्या कधी भारतात आल्या नाहीत, पण योग प्रचारासाठी त्यांनी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं” “योग फक्तच विद्या नाही, विज्ञान आहे. मानवीय मस्तिष्कासाठी एका विषयावर लक्ष केंद्रीत करण कठीण बनलय. एकाग्रता मानवी मनाची मोठी ताकद आहे. योगाच्या माध्यमातून ही एकाग्रता साध्य करणं शक्य होतय”असं पीएम मोदी म्हणाले.


योग इकोनॉमी बद्दल पंतप्रधान काय म्हणाले?

“मागच्या 10 वर्षात योगाचा विस्तार झाला आहे. योगा संदर्भातील धारणा बदलल्या आहेत. नवीन योग इकोनॉमी पुढे जात आहे. ऋषिकेश, काशी ते केरळमध्ये योग पर्यटन दिसून येतेय. अस्सल योगा शिकण्यासाठी लोक जगभरातून इथे येत आहेत. लोक फिटनेससाठी पर्सनल योग ट्रेनर ठेवत आहेत. योगामुळे नवीन रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत” याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष वेधलं.