असं काय लिहिलं होतं ज्यामुळे लष्करी अधिकारी झाले भावूक? ऑपरेशन सिंदूरनंतर लोकांनी सैन्याला पाठवली होती पत्रे

ऑपरेशन सिंदूर सुरु असताना देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांनी भारतीय सैन्याला भावनिक पत्रे पाठवली होती. ही पत्रे वाचल्यानंतर अधिकारी भावूक झाले आहेत.

असं काय लिहिलं होतं ज्यामुळे लष्करी अधिकारी झाले भावूक? ऑपरेशन सिंदूरनंतर लोकांनी सैन्याला पाठवली होती पत्रे
Indian People Letter to Army
| Updated on: Jun 15, 2025 | 9:37 PM

गेल्या महिन्यात भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव निर्माण झाला होता. पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. ऑपरेशन सिंदूर सुरु असताना देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांनी भारतीय सैन्याला भावनिक पत्रे पाठवली होती. या पत्रांमध्ये देशवासीयांनी सैन्याच्या शौऱ्याचे कौतुक केले होते. भारतीय नागरिकांच्या सैन्याबद्दल काय भावना आहेत त्या सैन्यापर्यंत पोहोचवण्याचे काम या पत्रांमधून करण्यात आले होते.

ही पत्रे वाचल्यानंतर अधिकारी भावूक

देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेली पत्रे वाचताना अधिकारी भावूक झाले होते. यानंतर बोलताना लष्करी अधिकाऱ्यांनी म्हटले की, ‘ही पत्रे वाचल्यानंतर सर्व थकवा नाहीसा होतो. आम्हाला वाटते की देशातील जनता आमच्यासोबत आहे. या पत्रांमध्ये माजी सैनिकांचे समर्पण, तरुणांचा उत्साह आणि ज्येष्ठांनी लिहिलेले शब्द भावूक करणारे आहेत. कोणीतरी लिहिले होते की, तुम्ही आमच्यासाठी भिंतीसारखे उभे आहात, आम्ही तुमच्यासाठी नेहमीच प्रार्थना करतो. आणखी एकाने आपल्या पत्रात, तुमचा गणवेश आमच्या अभिमानाचे प्रतीक आहे असे म्हटल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले.

सोशल मीडियावर पत्रे केली शेअर

दहशतवाद्यांच्या कारवाईला उत्तर देताना, भारतीय सैन्याने पाकिस्तानचे अनेक हवाई तळ नष्ट केले होते. त्यानंतर ही पत्रे पाठवण्यात आली होती. ही पत्रे पोस्ट, ईमेल, सोशल मीडिया आणि अनेक शाळांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली होती. त्यानंतर आता सैन्याने ही पत्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत.

पत्रे शेअर करनाना भारतीय सैन्याने म्हटले की, “भारतीय लोकांच्या या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल आम्ही आभारी आहोत. हे आम्हाला प्रत्येक क्षणी आमच्या कर्तव्यासाठी अधिक समर्पित करते.”

 

भारतीय सैन्याने पुढे म्हटले की, ही पत्रे भारतीय सैन्याबद्दल जनतेचा असलेला पाठिंबा, आदर आणि कृतज्ञता प्रतिबिंबित करतात. या पत्रांमधील शब्द आम्हा आपल्या सर्वांना सतत प्रेरणा देते. भारतीय सैन्य नेहमीच समर्पणाने राष्ट्राची सेवा करण्यात गुंतलेले असते.

ऑपरेशन सिंदूर

दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये 26 निष्पाप पर्यटकांची हत्या केली होती. यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर सुरू करत पाकिस्तानमधील आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ले केले. यात शंभराहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता.