Pahalgam Terror Attack : मोठी बातमी! पाकिस्तानविरोधात मिळाला मोठा पुरावा, संशयित दहशतवादी पहिल्यांदाच कॅमेऱ्यात कैद

पहलगाम हल्ल्यानंतर या दहशतवाद्यांचं रेखाचित्र जारी करण्यात आलं होतं. मात्र आता हे संशयित दहशतवादी कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

Pahalgam Terror Attack : मोठी बातमी! पाकिस्तानविरोधात मिळाला मोठा पुरावा, संशयित दहशतवादी पहिल्यांदाच कॅमेऱ्यात कैद
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 26, 2025 | 7:23 PM

मंगळवारी पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये 26 जणांना आपला जीव गमवावा लागला, त्यामध्ये दोन परदेशी नागरिकांचा देखील समावेश होता. या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत. सिंधु नदीच्या पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आली आहे, तसेच अटारी बॉर्डर देखील बंद करण्यात आली आहे. दरम्यान आता सर्वात मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे हे संशयित हल्लेखोर पहिल्यांदाच कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

हल्ल्यानंतर या दहशतवाद्यांचं रेखाचित्र जारी करण्यात आलं होतं. मात्र आता हे संशयित दहशतवादी कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. महाराष्ट्रातल्या पर्यटकांच्या मोबाईमध्ये हे संशयित दहशतवादी कैद झाले आहेत. मावळचे पर्यटक श्रीजीत रमेश यांनी या संदर्भात एनआयएला माहिती दिली आहे. पहलगामला ते गेले होते, तिकडे फिरत असताना ते आपल्या मुलीचा व्हिडीओ काढत असताना हे संशयित दहशतवादी त्यामध्ये कैद झाले आहेत. हा व्हिडीओ एनआयएकडे सोपवण्यात आला असून, तपासाला सुरुवात झाली आहे.

नेमकं काय म्हणाले श्रीजीत रमेश?  

मी तिकडे गेले होतो, तेव्हा माझी सहा वर्षांची जी मुलगी आहे, तिच्यासोबत मी रिल्ससाठी एक व्हिडीओ शूट करत होतो. आम्ही हा व्हिडीओ चित्रित केला, त्यानंतर आम्ही तिकडे फिरून गुलमर्गला गेलो आणि पुन्हा वापस पुण्याला परतलो. पुण्यात आल्यानंतर मला या हल्ल्याबाबत माहिती मिळाली.  त्यानंतर दहशतवाद्यांचे  रेखाचित्र जारी करण्यात आले होते, ते बघून आम्हाला असं वाटलं की आम्ही यांना कुठेतरी पाहिलं आहे. त्यामुळे मी माझे पहलगाममधील सर्व व्हिडीओ चेक केले. त्यामध्ये आम्हाला हे दोन्ही दहशतवादी कैद झाल्याचं दिसलं. आम्ही त्यांची रेखाचित्र पाहिली होती, त्यामुळे ते हेच असल्याची आमची खात्री पटली असं रमेश यांनी म्हटलं आहे.

मंगळवारी हा दहशतवादी हल्ला झाला होता, दहशतवाद्यांनी तिथे आलेल्या पर्यटकांना नाव विचारून त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेत 26 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता भारतानं पाकिस्तानविरोधात कडक कारवाई केली आहे.