Pahalgam Terror Attack : ‘मी सर्वांना हरवणार…’, शुभमचा शेवटचा Video, कुटुंबासोबत खेळत होता पत्ते

शुभम द्विवेदीचं दोनच महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं. लग्नानंतर तो आपल्या कुटुंबासोबत पर्यटनासाठी जम्मू काश्मीरला आला होता.

Pahalgam Terror Attack : मी सर्वांना हरवणार..., शुभमचा शेवटचा Video, कुटुंबासोबत खेळत होता पत्ते
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 23, 2025 | 10:16 PM

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला. या हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये कानपूरमधील रहिवासी असलेल्या शुभम द्विवेदी यांचा देखील समावेश आहे. शुभम द्विवेदी याचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे. दहशतवादी हल्ला ज्या दिवशी झाल्या त्यापूर्वी रात्री हा व्हिडीओ शूट करण्यात आला होता. शुभमची पत्नी ऐशान्याने हा व्हिडीओ तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवर पोस्ट केला होता. शुभम आणि त्याचं कुटुंब जम्मू -काश्मीरमध्ये पर्यटनासाठी आलं होतं. तो खूप आनंदी होता. तो आपल्या कुटुंबासोबत पत्ते खेळत आहे, मी आता सर्वांना हरवणार असं तो मोठ्या उत्साहाच्या भरात आपल्या कुटुंबाला म्हणत असल्याचं या व्हिडीओ मधून दिसून येत आहे. मात्र दुसऱ्या दिवशी आपल्या सोबत असं काही घडणार आहे, ही आपली शेवटची रात्र आहे, याची थोडी देखील त्याला कल्पना नव्हती.

शुभम द्विवेदीचं दोनच महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं. लग्नानंतर तो आपल्या कुटुंबासोबत पर्यटनासाठी जम्मू काश्मीरला आला होता. तो पहलगामला एका हॉटेलमध्ये आपल्या कुटुंबासोबत मुक्कामी होता. मंगळवारी आपल्या पत्नीसोबत तो पहलगाम फिरण्यासाठी बाहेर पडला, त्याचवेळी दहशतवाद्यांनी हल्ला केला. पत्नीच्या समोरच दहशतवाद्यांनी त्याच्यावर गोळीबार केला, या घटनेत त्याचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

दरम्यान या हल्ल्यानंतर आता भारतानं पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत, पाच मोठे निर्णय घेण्यात आले आहेत, ज्यामध्ये पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पुढच्या 48 तासांमध्ये पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडावा असे आदेश देण्यात आले आहेत. अटारी बॉडर बंद करण्यात आली आहे, सिंधु पाणी कराराला स्थगिती देण्यात आली आहे, तसेच पाकिस्तानच्या पाच अधिकाऱ्यांची हाकालपट्टी करण्यात आली आहे. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज जम्मू काश्मीरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. अनेक ठिकाणी संचारबंदी सदृश्य परिस्थिती होती.