Pahalgam Attack : दहशतवादी हल्ल्याची गंभीरता पाहून पंतप्रधान मोदींनी सौदी अरब दौऱ्यात घेतला मोठा निर्णय

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचा मृत्यू आणि अनेक लोक जखमी झाले आहेत. पर्यटकांना लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Pahalgam Attack : दहशतवादी हल्ल्याची गंभीरता पाहून पंतप्रधान मोदींनी सौदी अरब दौऱ्यात घेतला मोठा निर्णय
पंतप्रधान मोदी
Image Credit source: PM Modi Twitter
| Updated on: Apr 23, 2025 | 12:00 AM

जम्मू काश्मीरमधील पहलगाम भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. श्रीनगर पासून 100 किलोमीटर लांब असलेल्या पहलगामच्या बैसरन खोऱ्यात हा हल्ला करण्यात आला. पर्यटनासाठी गेलेल्या निष्पाप नागरिकांचा यात बळी घेण्यात आला. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून ठार मारले, असं वाचलेल्या काही जणांनी मीडियाशी बोलताना सांगितलं. या हल्ल्याची गंभीरता पाहून गृहमंत्री अमित शाह देखील श्रीनगरला ठाण मांडून बसले आहेत. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरब दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. मध्यरात्रीच मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन दिवसांचा सौदी अरब दौऱ्यावर गेले होते, मात्र हा दौरा त्यांनी स्थगित केला.  आता ते बुधवारी कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत भाग घेणार आहेत. कॅबिनेट सुरक्षा समिती आणि तिन्ही सैन्याच्या प्रमुखांसोबतही बैठक होऊ शकते.

सौदी अरेबियाने आयोजित केलेल्या रात्रीच्या जेवणाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हजेरी लावली नाही. दरम्यान, दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून हल्ल्याचा निषेध केला होता. त्याने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिलं की, ‘या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो. या घृणास्पद कृत्यामागे असलेल्यांना शिक्षा होईल आणि त्यांना सोडलं जाणार नाही. दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आमचा निर्धार दृढ आहे.’

पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विधानही समोर आले आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, ‘काश्मीरमधून खूप धक्कादायक बातमी आली आहे. दहशतवादाविरुद्ध अमेरिका भारतासोबत खंबीरपणे उभी आहे. आम्ही मृतांच्या आत्म्यास शांती आणि जखमींच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करतो.’

22 एप्रिल 2025 रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास लष्करी गणवेशात 2 ते 3 दहशतवादी बैसरन खोऱ्यात घुसले आणि पर्यटकांवर गोळीबार केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली. लष्करी गणवेशात असल्याने पर्यटकांना दहशतवादी असल्याचा अंदाजच आला नाही.