
Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याबाबत राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) मोठे यश मिळाले आहे. दहशतवाद्यांना आश्रय दिल्याच्या आरोपाखाली एनआयएने दोघांना अटक केली आहे. हे दोन्ही संशयित पहलगामचे रहिवासी आहेत. अटक केलेल्या दोघांची नावे परवेज अहमद जोथर आणि बशीर अहमद जोथर आहे.
एनआयएला चौकशी दरम्यान तीन दहशतवाद्यांची ओळख पटली आहे, असे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे. या तिघांचा संबंध बंदी घातलेल्या दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबा (एलईटी) सोबत आहे. हे तिन्ही जण पाकिस्तानी नागरिक आहेत. एनआयएच्या तपासानुसार, परवेझ आणि बशीर यांनी हल्ल्यापूर्वी हिल पार्कमधील तात्पुरत्या झोपडीमध्ये दहशतवाद्यांना आश्रय दिला होता. तसेच अन्न आणि लॉजिस्टिकल सपोर्ट पुरवला होता. दहशतवाद्यांनी या ठिकाणी राहूनच पर्यटन स्थळाची रेकी केली होती. तसेच धर्म विचारुन हत्या केली होती. त्यात २६ पर्यंटकांचा मृत्यू झाला. राष्ट्रीय तपास संस्थेने म्हटले की, परवेज अहमद जोथर आणि बशीर अहमद जोथर या दोघांना बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायदा, १९६७ च्या कलम १९ अंतर्गत अटक करण्यात आली आहे.
एनआयए पहलगाव दहशतवादी हल्लाचा तपास करत आहे. या प्रकरणातील दहशतवाद्यांना अटक करण्यात अद्याप यश आले नाही. परंतु दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या दोघांना अटक करण्यात यश आले आहे. हल्ल्यानंतर एनआयएने दहशतवाद्यांचे स्केच जारी केले होते. त्यानंतर या दहशतवाद्यांची माहिती देण्यासाठी मोठी रक्कम बक्षीस म्हणून जाहीर केली होती. परंतु अजूनही दहशतवाद्यांना अटक झाली नाही.
दहशतवादी हल्ला पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झाला. ज्याला ‘मिनी स्वित्झर्लंड’ असेही म्हटले जाते. त्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. या कारवाईत भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये असणारी 9 दहशतवादी तळ नष्ट केली होती.