अजित पवार यांचे पीएसओ विदीप जाधव अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. या विमानात त्यांचे सुरक्षारक्षक म्हणून कर्तव्यावर असलेले विदीप जाधव यांचाही मृत्यू झाला. विदीप जाधव यांच्यावर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Ajit Pawar Death : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीत विमान अपघातामध्ये निधन झाले. त्यांच्यावर 29 जानेवारी रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले असून ते अनंतात विलीन झाले आहेत. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. धडाडीने काम करणाऱ्या नेत्यांमध्ये अजित पवार यांचे नाव शीर्षस्थानी होते. अजित पवार बारामतीत 28 जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रचारसभा घेणार होते. परंतु त्याआधीच काळाने घाला घातला. अजित पवार ज्या विमानात प्रवास करत होते, त्यातील चार जणांचा मृत्यू झाला. यामध्ये अजित पवार यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव यांचाही समावेश आहे. विदीप जाधव गेल्या कित्येक वर्षांपासून अजितदादांचे पीएसओ होते. दरम्यान, विदीप जाधव यांच्यावर त्याच्या साताऱ्यातील तरडगाव या मूळ गावी रात्री उशिरा (28 जानेवारी) अंत्यसंस्कार करण्यात आले.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
विदीप जाधव हे मुंबई पोलीस दलात कार्यरत होते. ते अजित पवार यांचे पीएसओ होते. ते मूळचे फलटण तालुक्यातील तरडगाव येथील रहिवासी होते. याच गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 28 जानेवारी रोजी रात्री साडे अकरा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तरडागवमध्ये त्यांचे पार्थीव रात्री उशिरा पोहोचले. त्यानंतर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कर्तव्य, शिस्त आणि निष्ठा यांचे मूर्तिमंत उदाहरण
विदीप जाधव हे मुंबई पोलीस दलातील २००९ बॅचचे पोलीस कर्मचारी होते. ते कर्तव्य, शिस्त आणि निष्ठा यांचे मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांच्या अचानक जाण्याने पोलीस दलासह कुटुंबीय, मित्रपरिवार व गावावर शोककळा पसरली आहे.
बारामतीत शोककळा
दरम्यान, अजित पवार यांच्यावर 29 जानेवारी रोजी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राज्यातील सर्व महत्त्वाचे आणि मोठे नेते उपस्थित होते. तसेच अजितदादा यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे हजारो लोक बारामतीत दाखल झाले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा हेदेखील दिल्लीहून अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी बारामतीत आले होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील या दु:खद प्रसंगी पवार कुटुंबीयांना धीर देण्यासाठी उपस्थित होते.
