WPL 2026: यूपी वॉरियर्सला नमवत आरसीबीची अंतिम फेरीत धडक, एलिमिनेटरच्या दोन जागांसाठी चुरस
वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेच्या 18व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने यूपी वॉरियर्सचा धुव्वा उडवला. या विजयासह आरसीबीने अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता एलिमिनेटरच्या दोन जागांसाठी चुरस असणार आहे.

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या साखळी फेरीतील 18 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि यूपी वॉरियर्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल आरसीबीच्या बाजूने लागला आणि कर्णधार स्मृती मंधानाने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. यूपी वॉरियर्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडी गमवून 143 धावा केल्या. तसेच विजयासाठी 144 धावांचं आव्हान ठेवलं आहे. हे आव्हान आरसीबीने 13.1 षटकात पूर्ण केलं. या स्पर्धेत आठ पैकी 6 सामन्यात विजय मिळवून 12 गुणांसह आरसीबीने अंतिम फेरीत स्थान पक्क केलं आहे. तर अजूनही एलिमिनेटरच्या दोन जागांसाठी चार संघात चुरस असणार आहे. गुजरात जायंट्स, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दावेदारांपैकी एक आहेत. तर यूपी वॉरियर्सचं संपूर्ण गणित जर तर वर अवलंबून आहे.
यूपी वॉरियर्सकडून कर्णधार मेग लेनिंग आणि दीप्ती शर्मा यांना चांगली सुरूवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी या दोघांनी 74 धावांची भागीदारी केली. मेग लेनिंगने 30 चेंडूत 41 आणि दीप्ती शर्माने 43 चेंडूत 55 धावा केल्या. मात्र त्यानंतर डाव पत्त्यासारखा कोसळला. एकही फलंदाज 15 धावांचा टप्पा गाठू शकलं नाही. एमी जोन्स 1, हरलीन देओल 14, क्लो ट्रायन 6, श्वेता सेहरावत 7, सिम्रन शेख 10, सोफी एक्सलस्टोन 0 धावांवर बाद झाले. आरसीबीकडून नदीन दी क्लार्कने भेदक गोलंदाजी केली. तिने 4 षटकात 22 धावा देत 4 गडी बाद केले. तर ग्रेस हॅरिसने 2, लॉरेन बेलने 1 आणि श्रेयंका पाटीलने 1 गडी बाद केला.
यूपी वॉरियर्सने विजयासाठी दिलेल्या 144 धावांचा पाठलाग करताना आरसीबीने आक्रमक सुरुवात केली. ग्रेस हॅरिस आणि स्मृती मंधानाने जो गोलंदाज समोर दिसेल त्याला फोडून काढलं. पहिल्या विकेटसाठी या जोडीने 108 धावांची भागीदारी केली. ग्रेस हॅरिस 37 चेंडूत 13 चौकार आणि 2 षटकार मारून 75 धावांवर बाद झाली. तर स्मृती मंधानाने 27 चेंडूत नाबाद 54 धावांची खेळी केली. तिने 8 चौकार आणि 2 षटकार मारले. जॉर्जिया वोलने 16 धावा केल्या. आता आरसीबीचा संघ थेट 5 फेब्रुवारीला जेतेपदासाठी मैदानात उतरणार आहे. आता त्यांना अंतिम फेरीत कोणाचं आव्हान मिळतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
