“मी तुला मारणार नाही, मोदींना हे सांग…” पहलगाममध्ये नवऱ्याला मारताच अतिरेक्याने महिलेला धमकावलं

पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला. कर्नाटकातील मंजूनाथ यांच्या पत्नी पल्लवी यांनी हल्ल्याचा थरारक अनुभव सांगितला. दहशतवादी केवळ हिंदूंना लक्ष्य करत होते. पल्लवी आणि मुलाने दहशतवाद्यांना गोळी घालण्याची विनंती केली.

मी तुला मारणार नाही, मोदींना हे सांग... पहलगाममध्ये नवऱ्याला मारताच अतिरेक्याने महिलेला धमकावलं
Pahalgam Terror Attack
| Updated on: Apr 22, 2025 | 11:55 PM

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये भीषण दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात तब्बल २७ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. पहलगाममधील अनंतनाग जिल्ह्यातील बैसरन खोऱ्याच्या वरच्या बाजूला टेकड्यांवर फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्यात कर्नाटकातील शिवामोगा येथील मंजूनाथ यांचा मृत्यू झाला. मंजूनाथ यांच्या पत्नी पल्लवी यांनी या हल्ल्याचा थरारक अनुभव सांगितला आहे. तसेच या हल्ल्यापूर्वीचा त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

कर्नाटकच्या शिवमोग्गा जिल्ह्यात राहणारे मंजुनाथ हे त्यांच्या पत्नी पल्लवी आणि मुलासोबत जम्मू-काश्मीरमध्ये फिरण्यासाठी आले होते. ते पहलगाम फिरत असताना हा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात मंजुनाथ यांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. पल्लवी यांनी या हल्ल्याचा थरारक अनुभव सांगितला आहे.

पल्लवी यांनी सांगितला अनुभव

पल्लवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते दहशतवादी केवळ हिंदू लोकांना लक्ष्य करून गोळ्या घालत होते. त्यांनी माझ्या नवऱ्याला मारल्यानंतर मी आणि माझ्या मुलाने दहशतवाद्यांना सांगितलं की तुम्ही माझ्या नवऱ्याला मारलं आहे, आता आम्हालाही मारा. त्यावर एका दहशतवाद्याने मला सांगितलं की मी तुम्हाला मारणार नाही, जा आणि मोदींना हे सगळं सांगा. या हल्ल्यानंतर स्थानिक लोकांनी आम्हाला मदत केली. तिथल्या तीन स्थानिक लोकांनी आमचे प्राण वाचवले,” असे पल्लवीने सांगितले.

तसेच या हल्ल्याच्या आदल्या दिवशीच्या मंजुनाथ आणि त्यांच्या पत्नीचा शिकारा राईडचा व्हिडीओही व्हायरल होत आहे. या व्हिडीओत मंजुनाथ हे त्यांच्या काश्मीरच्या संपूर्ण ट्रीपची माहिती देत आहेत. तसेच त्यांच्या पत्नी पल्लवी यांनीही बोट हाऊसमध्ये राहण्याचा अनुभव कमाल असल्याचे सांगितले. त्यानंतर काल त्यांचा काश्मीर टूरचा दुसरा दिवस होता आणि तेव्हा ते शिकार राईड करत होते. यावेळी त्या दोघांनीही या टूरचा अनुभव कमाल असल्याचे म्हटले होते. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून तीव्र निषेध

दरम्यान या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. “या घृणास्पद कृत्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना सोडले जाणार नाही. त्यांचा नापाक अजेंडा कधीही यशस्वी होणार नाही. दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आमचा निर्धार अटळ आहे. तो अधिक मजबूत होईल. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो. पीडितांना सर्वतोपरी मदत केली जाईल,” असे पंतप्रधान मोदींनी म्हटले.