
सगळे जग 2026 या नववर्षाचं हात पसरून स्वागत करतंय. जल्लोष, सेलिब्रेशन करत सर्वजण आनंदाने एकमेकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. मात्र दुसरीकडे भारताच शेजारी, पाकिस्तान हा काही सुधारण्याची चिन्ह नाहीत. त्यांच्या ‘नापाक’ हरकती, कुरापती सुरूच आहेत. त्याचं मुख्य कारण म्हणजे नव्या वर्षातच जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये एक पाकिस्तानी ड्रोन दिसला आहे. हा ड्रोन दिसताच भारतीय जवान सावध झाले असून , या ड्रोनच्या शोधार्थ सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा पाकिस्तानी ड्रोन नियंत्रण रेषेजवळील पूंछमधील करमाडा खाडी भागात भारतीय हद्दीत घुसला. एवढंच नव्हे तर तो ड्रोन पाच मिनिटांपेक्षा जास्त काळ भारतीय हद्दीतच होता. हे लक्षात येताच भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी या भागात मोठी शोध मोहीम सुरू केली आहे. एजन्सीकडून ड्रोनच्या फ्लाइट ट्रॅकची तपासणी केली जात आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने, जम्मू आणि काश्मीर प्रशासनाने अलीकडेच केंद्रशासित प्रदेशाच्या काही भागात व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (VPN) वापरण्यास बंदी घातली आहे. राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि अशांतता भडकवण्याची शक्यता या कारणांच्या पार्श्वभूमीवर ही बंदी घालण्यात आली आहे. मात्र या बंदीनंतरही नियंत्रण रेषेजवळ (LoC) ड्रोनच्या हालचाली झाल्या असून ही दुसरी वेळ आहे.
सांबामध्येही आढळला होता ड्रोन
गेल्या 24 तासांत भारत-पाकिस्तान सीमेजवळ दिसलेला हा दुसरा ड्रोन आहे. पहिला संशयित ड्रोन सांबा जिल्ह्यातील फुलपूर भागात दिसला. त्यावेळी, हा ड्रोन काही काळासाठी भारतीय हद्दीत होता. मात्र त्यानंतर काही वेळातच तो परत गेला. या प्रकरणाचा तपास करण्यात आल्यावर काहीही आढळलं नाही.
पहलगाम हल्ल्यानंतर मे 2025 मध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवण्यात आलं. त्यानंतर पाकिस्तानकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या घटनांमुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला होता. त्यावेळी पाकिस्तानने भारतीय सीमेवर अनेक ड्रोन पाठवले होते. पण भारतीय सैन्याने ते सर्व पाडले होते. यावेळी, ड्रोनच्या हालचाली लक्षात येताच लष्कराने ताबडतोब सर्च मोहीम सुरू केली.