
पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे. पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण आहे. भारतानं सिंधू जल वाटप कराराला स्थगिती दिल्यानंतर आता भारताचं पुढचं पाऊल काय असणार यामुळे पाकिस्तानची चिंता वाढली आहे. आता या प्रकरणात अमेरिकेची एन्ट्री झाली आहे. अमेरिकेने भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांसोबत संवाद साधला आहे. या प्रकरणावर चर्चेतून तोडगा काढवा अशी मागणी अमेरिकेकडून करण्यात आली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ता टॉम ब्रूस यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
टॉम ब्रूस यांनी काय म्हटलं?
अमेरिका भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांच्या संपर्कात आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी या संदर्भात मला नोट्स देखील दिल्या आहेत. त्यामुळे काश्मीरमध्ये निर्माण झालेल्या स्थितीसंदर्भात आमचं भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांशी बोलणं सुरू आहे.
भारत आणि पाकिस्तानने पहलगाम हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवावे,असं अमेरिकेनं म्हटलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री लवकरच दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत संवाद साधणार आहेत. तसेच या प्रकरणावर इतर राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी देखील भारत आणि पाकिस्तानशी बोलावं यासाठी देखील ते प्रयत्न करत आहेत.
अमेरिकेचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ता टॅम ब्रूस यांनी पुढे बोलताना म्हटलं की, लवकरच भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या या परिस्थितीसंदर्भात अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री दोन्ही राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत बोलतील. आमचं प्रत्येक घडामोडीवर लक्ष आहे. आम्ही भारत आणि पाकिस्तान सरकारच्या संपर्कात आहोत. सध्या भारत आणि पाकिस्तानकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे चर्चेतून तोडगा निघाला पाहिजे, असं ब्रूस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील मोठं वक्तव्य केलं होतं. अमेरिकेनं तटस्थ भूमिका घेतल्याचं यातून दिसून येत आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश आमच्यासाठी जवळचे आहेत. चर्चेतून मार्ग काढावा असं त्यांनी म्हटलं होतं.