
Train Hijack Case: पाकिस्तानमध्ये ट्रेन हायजॅकचा प्रकार समोर आला. बलूच आर्मीने संपूर्ण ट्रेन हायजॅक केली. या ट्रेनमध्ये पाकिस्तान लष्कारीतील जवान, पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचे कर्मचारी आणि पोलीससुद्धा आहेत. पाकिस्तानातील या घटनेनंतर भारतातील ट्रेन हायजॅकच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. भारतात ट्रेन हायजॅक झाल्याची घटना घडली होती. 6 फेब्रुवारी 2013 रोजी देशात पहिली ट्रेन हायजॅक झाली होती. मुंबईवरुन हावडा जाणारी रेल्वे छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात हायजॅक करण्यात आली होती.
माओवाद्यांनी भारतीय रेल्वेची संपूर्ण ट्रेन हायजॅक केली होती. 6 फेब्रुवारी 2013 रोजी मुंबई-हावडा मुख्य रेल्वे मार्गावर धावणाऱ्या जनशताब्दी ट्रेनचे अपहरण माओवाद्यांनी केले होते. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. संपूर्ण जनशताब्दी ट्रेन आणि त्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुमारे 1.25 किलोमीटरपर्यंत ओलीस ठेवण्यात आले होते. भारतात प्रथमच एखादी ट्रेन हायजॅक करण्यात आली होती.
आरोपी उपेंद्र सिंग उर्फ कबरा याला पळवून नेणे हा ट्रेनच्या हायजॅक मागे मुख्य उद्देश होता. हे प्रकरण जयचंद वैद्य अपहरण प्रकरणाशी संबंधित आहे. 2001 मध्ये पोलिसांनी व्यापारी जयचंद वैद्य अपहरण प्रकरणात उपेंद्र सिंह उर्फ कबरा याला मुख्य आरोपी बनवले होते. जयचंद वैद्य यांचे 29 मार्च 2001 रोजी अपहरण करण्यात आले होते. त्यांना 44 दिवस ओलीस ठेवण्यात आले होते. यानंतर खंडणी मिळाल्यावर हातपाय बांधून त्यांना मुघलसराय स्थानकात सोडण्यात आले. या प्रकरणातही 12 जणांना आरोपी करण्यात आले होते. उपेंद्र सिंग उर्फ कबरा हा मुख्य आरोपी होता. एकदा त्याला पोलिसांनी पकडल्यानंतर तो मध्यवर्ती कारागृहातून फरार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला उत्तर प्रदेशातून अटक केली.
शेकडो प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी कित्येक तास ओलीस राहिले. या हायजॅकिंगमध्ये छत्रधर नावाच्या माओवाद्यांचे नाव समोर आले होते. त्याच्या सांगण्यावरून संपूर्ण ट्रेन हायजॅक करण्यात आली होती. माओवाद्यांनी त्यांच्या नेत्याची सुटका करण्यासाठी प्रवाशांनी भरलेली ट्रेन ओलीस ठेवली. प्रवाशांना मारहाण करून लुटले होते. अनेक तासांच्या अथक परिश्रमानंतर लष्कराच्या मदतीने रेल्वेतील ओलिसांची सुखरूप सुटका करण्यात आली.