बलूच आर्मीसमोर पाकिस्तानी लष्कर सरेंडर, वाचा फक्त 6000 सैनिक असलेल्या या संघटनेची पूर्ण कुंडली
Train hijack in Pakistan: बलूच आर्मीचे सैनिक गनिमी युद्धनीतीचा अवलंबन करतात. ते पाकिस्तानी लष्कर, पोलीस आणि सरकारी आस्थापनांवर हल्ले करतात. विशेषतः बलूच लोक चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) च्या विरोधात आहे.

Train hijack in Pakistan: पाकिस्तानमध्ये दशतवादी आणि विद्रोहींची मुळे चांगलीच रुजली आहे. आता मंगळवारी पाकिस्तानची संपूर्ण ट्रेन हायजॅक झाली. बलूच लिबरेशन आर्मीने (BLA) पाकिस्तानची जफर एक्सप्रेस ट्रेन हायजॅक केली. त्यात जवळपास 450 प्रवाशी होते. त्यांना बलूच लिबरेशन आर्मीने ओलीस ठेवले. या ट्रेनमध्ये पाकिस्तानी लष्कराचे सैनिक, पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयचे कर्मचारी आणि पोलीस होते. बलूच आर्मीने प्रवाशांना सोडून दिले. परंतु 140 सैनिकांना ओलीस ठेवले आहे.
बलूच लिबरेशन आर्मीची स्थापना बलूचिस्तानला पाकिस्तानपासून वेगळे करण्यासाठी झाली. त्यांच्या या भूभात चीनची गुंतवणुकीस आणि पाकिस्तानी लष्काराच्या नियंत्रणास त्यांचा विरोध आहे. या घटनेमुळे पाकिस्तानमधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाला आहे. बलूच आर्मीने या घटनेमुळे सर्वांचे लक्ष वेधले आहे. ही आर्मी आहे तरी कशी जाणून घेऊ या…
काय आहे स्थानिकांचा आरोप
बलूच लिबरेशन आर्मीची (BLA) स्थापना 2000 मध्ये झाली होती. या संघटनेकडून स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करण्यात आली. त्यासाठी त्यांनी पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तान लष्काराविरोधात सशस्त्र लढा सुरु केला. बलुचिस्तान हा पाकिस्तानचा सर्वात मोठा आणि संपन्न भूभाग आहे. परंतु तेथील रहिवाशांचा आरोप आहे की, सरकार त्यांच्या संसाधनांचा वापर इतर ठिकाणी करत आहे. स्थानिकांना त्यांचे हक्क मिळत नाहीत. त्यामुळे त्यांनी सशस्त्र लढा सुरु केला.
बलूचकडे होते फक्त 6,000 सैनिक
2000 मध्ये बलूच आर्मीची स्थापना झाली तेव्हा त्याची लष्करी ताकद सुमारे 6,000 सैनिकांची होते, असे सांगण्यात येते. मात्र, कालांतराने त्याच्या सदस्यांची संख्या कमी होत गेली. मजीद ब्रिगेड हा बीएलएचा एक विशेष आत्मघाती पथक आहे. त्यामध्ये सुमारे 100-150 आत्मघाती हल्लेखोरांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या डेटावरून बीएलएच्या एकूण लष्करी सामर्थ्याचा अंदाज लावला जाऊ शकतो. आकडेवारीनुसार, बलूचकडे सध्या 1,000-1,500 लढवय्ये आहेत. काही नवीन अहवाल सांगतात की बलूच सैनिकांची संख्या फक्त 600 च्या आसपास आहे.
गमिनीपद्धतीने करतात हल्ले
बलूच आर्मीचे सैनिक गनिमी युद्धनीतीचा अवलंबन करतात. ते पाकिस्तानी लष्कर, पोलीस आणि सरकारी आस्थापनांवर हल्ले करतात. विशेषतः बलूच लोक चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) च्या विरोधात आहे. याअंतर्गत चीनने बलुचिस्तानमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. बीएलए पाकिस्तानी लष्कर, आयएसआय आणि इतर सुरक्षा संस्थांना लक्ष्य करते. या संघटनेने अनेकदा चिनी नागरिकांवर हल्ले केले आहेत. ज्यामुळे चीन आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
