‘परीक्षा पे चर्चा’ उपक्रमाला भरभरून प्रतिसाद, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डकडून मिळाला सन्मान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'परीक्षा पे चर्चा' या प्रमुख उपक्रमाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. आता या उपक्रमाला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे.

परीक्षा पे चर्चा उपक्रमाला भरभरून प्रतिसाद, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डकडून मिळाला सन्मान
Pariksha pe Charcha
| Updated on: Aug 04, 2025 | 9:50 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या प्रमुख उपक्रमाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. एका महिन्यात या उपक्रमाने 3.53 कोटींहून अधिक नोंदणी आणि टेलिव्हिजनवर 21 कोटींहून अधिक प्रेक्षक मिळवून जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यामुळे या उपक्रमाला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे.

2018 पासून केंद्रीय शिक्षण मंत्रालय MyGov च्या सहकार्याने परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम आयोजित करत आहे. हे पंतप्रधान मोदी यांच्या कल्पनेतले एक अद्वितीय जागतिक व्यासपीठ आहे. या ठिकाणी ते विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी थेट संवाद साधतात. पंतप्रधानांचा हा उपक्रम परीक्षेच्या काळात सकारात्मकता निर्माण करतो. तसेच अभ्यासाची तयारी करण्यासाठी प्रेरित करतो. यामुळे परीक्षेतील ताणतणाव कमी होतो.

परीक्षा पे चर्चा या उपक्रमाला मिळालेल्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकृत प्रमाणपत्र नवी दिल्ली येथे झालेल्या एका विशेष समारंभात स्वीकारण्यात आले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी, रेल्वे आणि माहिती आणि प्रसारण), राज्यमंत्री जितिन प्रसाद, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार, MyGov चे सीईओ आणि इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, ‘पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील ‘परीक्षा पे चर्चा’ हा उपक्रम जोरात सुरु आहे. यामुळे ताणतणावाचे शिक्षणाच्या उत्सवात रूपांतर झाले आहे. परीक्षा पे चर्चा 2025 हा उपक्रम विविध प्लॅटफॉर्मवर 21 कोटींहून अधिक प्रेक्षकांनी पाहिला आहे. हे समावेशक आणि समग्र शिक्षणाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी म्हटले की, ‘विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना एकाच व्यासपीठावर आणून या उपक्रमाने तणावमुक्त आणि कल्याणकारी शिक्षणाला प्रोत्साहन दिले आहे. लोकांचा या उपक्रमावर विश्वास आहे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हा त्याचा पुरावा आहे.

यावेळी जितिन प्रसाद म्हणाले की, या उपक्रमामुळे तंत्रज्ञानाद्वारे लोकसहभाग वाढला आहे आणि परीक्षा पे चर्चाची पोहोच राष्ट्रीय पातळीपर्यंत वाढली आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 तणावमुक्त आणि आनंददायी शिक्षणावर भर देते. रट्टा मारण्याऐवजी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक आणि इतर गोष्टींची आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातात. याअंतर्गत ‘परीक्षा पे चर्चा’ आता एक देशव्यापी चळवळ बनली आहे. ही चळवळ विद्यार्थ्यांना आत्म-अभिव्यक्ती आणि आत्म-विकासाच्या संधी देते.