PM Modi: पंतप्रधान मोदींनी घेतला लसीचा दुसरा डोस

पंतप्रधान मोदी यांनी कोरोना लसीची पहिला डोस 1 मार्चला घेतला होता. | PM Narendra Modi vaccine

PM Modi: पंतप्रधान मोदींनी घेतला लसीचा दुसरा डोस
पंतप्रधान नरेंद्र मोदी
| Updated on: Apr 08, 2021 | 7:46 AM

नवी दिल्ली: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी लसीचा दुसरा डोस घेतला. त्यांनी ट्विटर अकाऊंटवरून लस घेतानाची छायाचित्रे शेअर केली. मी एम्स रुग्णालयात जाऊन कोव्हिड लसीचा दुसरा डोस घेतला. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी उपलब्ध असलेल्या मोजक्या मार्गांपैकी लस हा एक मार्ग आहे. तुम्ही लसीकरणासाठी पात्र असाल तर तात्काळ लस घेऊन टाका, असा संदेश पंतप्रधान मोदी यांनी दिला. पंतप्रधान मोदी यांनी कोरोना लसीची पहिला डोस 1 मार्चला घेतला होता. त्यांनी स्वदेशी बनावटीची कोव्हॅक्सिन ही लस टोचून घेतली होती. (PM Narendra Modi got second dose of the COVID-19 vaccine at AIIMS today)

दरम्यान, देशात सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वदेशी लसीला प्राधान्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी बनावटीच्या भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन लसीचे दोन डोस घेतले आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात कोव्हॅक्सीनच्या सुरक्षिततेविषयी अनेकांना साशंकता होती. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोव्हॅक्सीन ही देशी लस घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: कोव्हॅक्सीन टोचून घेतल्याने या लसीविषयीची शंका बऱ्याच प्रमाणात दूर झाली आहे. परिणामी लसीकरण मोहिमेचा वेगही वाढण्याचा अंदाज आहे.

शरद पवारांनीही घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही कोव्हिशिल्ड लसीचा दुसरा डोस नुकताच घेतला होता. शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी त्यांना हा डोस देण्यात आला होता. लसीचा पहिला डोस शरद पवार यांनी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात जाऊन घेतला होता.

कोरोना लस टोचून घेणं बंधनकारक आहे का?

कोरोनाची लस टोचून घेणं बंधनकारक नाही. ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार कोरोनाची लस घेऊ शकता. कोणावरही लसीसाठी जबरदस्ती नाही. लस घेणं किंवा न घेणं ऐच्छिक असेल.

लस घेण्यासाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं?

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोव्हिड 19 व्हॅक्सिनसाठी Co-WIN App तयार केलं आहे. हे अ‍ॅप प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड केल्यानंतर त्यावर रजिस्ट्रेशन करावं लागेल. सध्या तरी सर्वांना या अ‍ॅपचा अॅक्सेस नाही.

(PM Narendra Modi got second dose of the COVID-19 vaccine at AIIMS today)