इंग्लंड वारीच्या मोहात खतरनाक व्हिसा स्कॅम, 1 बायको 15 पतींचे कांड कसं घडलं? समोर आला मोठा ट्वीस्ट

पंजाबमधील भिंदर सिंह यांच्यासोबत व्हिसा फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार घडला. इंग्लंडला व्हिसा मिळवण्यासाठी त्यांनी एका इमिग्रेशन कंपनीला ५.९ लाख रुपये दिले. पण व्हिसा रद्द झाला आणि त्यांची पत्नी इंग्लंडमध्ये अटक झाली.

इंग्लंड वारीच्या मोहात खतरनाक व्हिसा स्कॅम, 1 बायको 15 पतींचे कांड कसं घडलं? समोर आला मोठा ट्वीस्ट
| Updated on: Sep 06, 2025 | 4:31 PM

सध्या फसवणुकीच्या विविध घटना समोर येत आहेत. आतापर्यंत अनेकांची काही ना काही कारणांवरुन फसवणूक झाल्याचे पाहायला मिळत होते. त्यातच आता पंजाबमध्ये व्हिसा आणि इमिग्रेशनच्या नावाखाली चालणाऱ्या फसवणुकीचा एक धक्कादायक आणि विचित्र प्रकार पंजाबमध्ये उघडकीस आला आहे. एका व्यक्तीने इंग्लंडला जाण्यासाठी व्हिसा अर्ज केला होता. मात्र त्यावेळी असं काही घडलं की ज्यामुळे त्यांच्या पत्नीला पोलिसांनी अटक केली. यानंतर त्या फिर्यादीने पोलिसात तक्रार केली आहे.

नेमकं काय घडलं?

पंजाबच्या राजपुरा येथील रहिवासी भिंदर सिंह यांना आपल्या मुलासह इंग्लंडमध्ये पत्नीकडे जायचे होते. यासाठी त्यांच्या पत्नीने इंग्लंडमधून त्यांना स्पॉन्सरशिप पाठवली होती. भिंदर सिंह यांनी व्हिसा मिळवण्यासाठी प्रशांत आणि रूबी नावाच्या एका इमिग्रेशन कंपनीशी संपर्क साधला. पण यामुळेच ते अडचणीत आले. यावेळी आरोपींनी व्हिसा प्रक्रियेसाठी त्यांच्याकडून ५ लाख ९० हजार रुपये घेण्यात आले. पण काही काळानंतर त्या कंपनीने भिंदर यांचा व्हिसा अर्ज रद्द झाल्याचे सांगण्यात आले. यामुळे त्यांना धक्का बसला.

तर दुसरीकडे भिंदर यांना कळले की इंग्लंडमध्ये त्यांच्या पत्नीला तेथील स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे. एकीकडे रद्द झालेला व्हिसा आणि दुसरीकडे पत्नीला झालेली अटक यामुळे ते गोंधळले होते. त्यांनी या प्रकरणाची अधिक चौकशी केली असता एक भयानक प्रकार त्यांच्या समोर आला.

इंग्लंडमधील अधिकाऱ्यांना संशय

आरोपी प्रशांत आणि रूबी यांनी भिंदर यांच्या पत्नीच्या ओळखपत्राचा गैरवापर केला. त्यांनी केवळ याच दाम्पत्याला फसवले नाही, तर त्यांच्या कागदपत्रांचा वापर करून १५ वेगवेगळ्या तरुणांना भिंदर यांच्या पत्नीचा बनावट पती बनवून इंग्लंडला पाठण्यात आले. यानंतर इंग्लंडमधील अधिकाऱ्यांना संशय आला. त्यानंतर तपासणी केली असता, त्यांना एकाच महिलेचा पती असल्याचे सांगत अनेकांनी अर्ज केल्याचे आढळले. यामुळेच भिंदर यांच्या पत्नीला इंग्लंडमधील पोलिसांनी अटक केली.

विशेष म्हणजे, या संपूर्ण गैरव्यवहाराबद्दल भिंदर यांच्या पत्नीला काहीही कल्पना नव्हती. या फसवणुकीमुळे संतप्त झालेल्या भिंदर सिंह यांनी तातडीने राजपुरा पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी प्रशांत आणि रूबी यांच्याविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. सध्या दोन्ही आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. हे प्रकरण व्हिसा प्रक्रियेतील गंभीर गैरव्यवहाराकडे लक्ष वेधते, जिथे सामान्य आणि निर्दोष लोकांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून असे गुन्हे केले जात आहेत. यामुळे व्हिसा अर्ज करताना इमिग्रेशन कंपन्यांची योग्य माहिती घेणे किती आवश्यक आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.