Rahul Gandhi: ज्ञानेश कुमारच मॅसेज… कोण पुरवतंय निवडणूक आयोगातील माहिती? राहुल गांधी यांचा अमेरिकेत खळबळजनक दावा
Rahul Gandhi on Gyanesh Kumar: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत बॉम्ब फोडला आहे. त्यांनी अनेक विषयांवर तिथे भाष्य केले आहे. त्याचवेळी त्यांनी ज्ञानेश कुमार, निवडणूक आयोग आणि एसआयआर प्रक्रियेवरून मोठा खुलासा केला आहे. कोण पुरवतंय त्यांना निवडणूक आयोगातील माहिती?

Rahul Gandhi on Gyanesh Kumar: निवडणूक आयोगासह आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी लवकरच नव्याने एल्गार पुकारणार आहेत. नवी दिल्लीत या महिन्याच्या अखेरीस SIR विरोधात पुन्हा मोठे आंदोलन करण्याच्या तयारीत काँग्रेस आहे. त्यापूर्वी अमेरिकेत काँग्रेस नेत्याने अमेरिकेत मोठा बॉम्ब टाकला आहे. निवडणूक आयोगातूनच आपल्याला अनेक बाबींची माहिती पोहोचत असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला. शिकागो विद्यापीठातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी निवडणूक आयोगातील कथित गडबडीबाबत भाष्य केले.
राहुल गांधी यांचा मोठा खुलासा
शिकागोमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना विरोधी पक्षनेत्याने अनेक मुद्यांवर भूमिका स्पष्ट केली. आता आम्ही अधिक मोकळेपणाने बोलत आहोत. निवडणूक आयोगातूनच आम्हाला माहिती मिळत आहे. ही व्यवस्था कधी संपुष्टात येणार याकडे आमचे लक्ष लागले आहे. काही वरिष्ठ अधिकारीच या बेबंदशाहीला कंटाळले आहेत. आम्ही यापुढे या गोष्टी पुढे नेऊ शकत नाही असे सांगत असल्याचा दावा राहुल गांधी यांनी या कार्यक्रमात केला. अर्थात त्यांनी ते अधिकारी कोण याचा खुलासा केला नाही.
ज्ञानेश कुमार यांचा मॅसेज?
यापूर्वी ऑक्टोबरमध्येच राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा मॅसेज आल्याचा दावा केला होता. त्यावेळी जेव्हा त्यांना विचारण्यात आले की ज्ञानेश कुमार त्यांच्याशी संपर्क साधतात का, ‘त्यावर मॅसेज येतात आणि ते ही पत्रकार परिषद पाहत आहेत.’ असे राहुल गांधी म्हणाले होते. तर त्यावेळी मुख्य निवडणूक आयुक्तांनी साक्षीदार व्हावे असे ते म्हणाले होते. त्यानंतर राजीनामा देऊन त्यांनी बाजूला व्हावे आम्ही त्यांच्याविषयी मनात अढी बाळगणार नाही, असे सुतोवाचही त्यांनी केले होते.
तर त्याचवेळी लोकशाही संपुष्टात येईल
जर विरोधकांनी निवडणुका लढवणे थांबवले, तर त्याच क्षणी भारतीय लोकशाही संपु्ष्टात येईल. त्यामुळे निवडणुकांवर बहिष्कार न टाकता, व्यवस्थेतील त्रुटी जनतेसमोर आणण्याची आमची रणनीती असल्याचे राहुल गांधी यांनी शिकागो येथील कार्यक्रमात स्पष्ट केले. अमेरिकेत राहुल गांधी यांनी केलेल्या या वक्तव्याचे देशात पडसाद उमटण्याची शक्यता आहे.