मोदी आडनाव बदनामी खटल्यातील राहुल गांधी यांची याचिका फेटाळली, दोन वर्षांची शिक्षा कायम

आम्हाला खालच्या कोर्टाने दिलेल्या आदेशात दखल देण्याची गरज वाटत नाही असे गुजरात हायकोर्टाने म्हटले आहे.

मोदी आडनाव बदनामी खटल्यातील राहुल गांधी यांची याचिका फेटाळली, दोन वर्षांची शिक्षा कायम
RAHUL Gandhi
Image Credit source: socialmedia
| Updated on: Jul 07, 2023 | 12:37 PM

नवी दिल्ली : मोदी आडनाव बदनामी खटल्यातील कॉंग्रेस नेते आणि माजी खासदार राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांची याचिका फेटाळण्यात आली आहे. राहुल यांची अपिल याचिका गुजरात हायकोर्टाने ( Gujrat High Court ) फेटाळल्याने आता त्यांची दोन वर्षांची शिक्षा कायम राहणार आहे. सुरत न्यायालयाने ( Surat Court ) मोदी आडनाव बदनामी ( Modi Sername Defamation Case ) प्रकरणात दिलेल्या निकालाला राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

2019 च्या निवडणूक प्रचार सभेत राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरुन टीका केली होती. त्याप्रकरणात सुरतचे भाजपा आमदार पुर्णेश मोदी यांनी मोदी समाजाची बदनामी झाल्याचा आरोप करीत अब्रुनुकसानीचा दावा केला होता. या याचिकेवर सुरतच्या कनिष्ट न्यायालयाने राहुल गांधी यांनी दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी देखील गमवावी लागली आहे.

अन्याय झाला असे म्हणू शकत नाही

गुजरात हायकोर्टाचे न्या.हेमंत प्रच्छक यांच्या समोर शुक्रवार सकाळी 11 वाजता या प्रकरणाची सुनावणी झाली. गुजरात न्यायालयाने म्हटले की राहुल यांच्या विरोधात किमान दहा खटले प्रलंबित आहेत. ही केस दाखल झाल्यानंतरही त्यांच्या विरोधात अन्य केस दाखल करण्यात आल्या आहेत. एक खटला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नातवाने दाखल केला आहे. त्यामुळे त्यांना दोषी ठरविणे जाण्याचा निकाल त्यांच्या विरोधात अन्याय झाला आहे असे म्हणू शकत नाही. त्यांनी दोषी ठरविण्याचा निकाल उचित आहे. आम्हाला खालच्या कोर्टाने दिलेल्या आदेशात दखल देण्याची गरज वाटत नाही. त्यामुळे आता राहुल गांधी यांना आता केवळ सर्वोच्च न्यायालयात जाण्याचाच मार्ग शिल्लक राहीला आहे.

ताज्या निकालातून बोध घ्यावा

राहुल गांधी यांची याचिका फेटाळल्यानंतर कॉंग्रेस मुख्यालयात कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. तर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांनी ट्वीट करीत गुजरात हायकोर्टाने राहुल गांधी यांची याचिका फेटाळल्याची माहीती दिली. राहुल गांधी आणि केजरीवाल यांचे राजकारणच दुसऱ्यांची निंदा मानहानी करण्याचे आहे. ताज्या निकालातून दोघांनी बोध घ्यावा अशी टीप्पणी त्यांनी केली आहे प्यार आणि मोहब्बतच्या दुकानाच्या आड त्यांनी मानहानीचे दुकान चालविले असल्याचेही मौर्य यांनी अन्य एका ट्वीटमध्ये म्हटले आहे.