दक्षिण भारतातील समुद्र किनाऱ्यांचा गोव्याच्या धर्तीवर होणार विकास, तब्बल 289 बिचचा कायापालट
आंध्रप्रदेश सरकारच्या योजनेनूसार 12 किनारपट्टीय जिल्ह्यांचे रुपडे बदलण्याची योजना आहे. पर्यटन विभागाने अनेक संस्थांच्या मदतीने यासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे.

नवी दिल्ली : निळेशार समुद्र किनारे म्हटलं की आपल्या गोवा ( Goa Beach ) येथील समुद्र किनारे आठवतात. समुद्री बिचने नटलेले गोवा आपल्याला नेहमीच खुणावत असते. प्रत्येक सिझनमध्ये पर्यटत गोव्याला फिरायला जात असतात. आता गोव्याचे वैशिष्ट्य असलेले समुद्र बिच चक्क दक्षिण भारतात ( South India ) अवतरणार आहेत. गोव्याच्या धर्तीवर आता आंध्रप्रदेशाने ( Andhra Pradesh ) कोस्टल झोन टुरिझम मास्टर प्लान तयार केला आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी येथील बिचना गोव्याच्या धर्तीवर विकसित केले जाणार आहे.
आंध्रप्रदेश सरकारच्या योजनेनूसार 12 किनारपट्टीय जिल्ह्यांचे रुपडे बदलण्याची योजना आहे. टाईम्सच्या वृत्तानूसार पर्यटन विभागाने अनेक संस्थांच्या मदतीने यासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात म्हटले आहे की 289 किनाऱ्यांचा पर्यटनासाठी विकास केला जाणार आहे. आंध्र प्रदेश सरकारने या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले असून त्यांनी खाजगी गुंतवणूक कंपन्यांच्या मदतीने या बिचचा कायाकल्प करण्याची योजना आखावी असे म्हटले आहे. आंध्रप्रदेशाला पर्यटन केंद्र म्हणून ओळख मिळावी आणि पर्यटक आकर्षित व्हावे अशी योजना आहे.
या जिल्ह्यात असणार सर्वात जास्त बिच
आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्याला सर्वात जादा फंड मिळणार आहे. या जिल्ह्यातील जवळपास 60 बिचसदृश्य ठीकाणांची निवड करण्यात आली असून इतर जिल्ह्यांच्या तुलनेत ही सर्वात जास्त संभाव्य बिचची संख्या आहे. याखालोखाल नेल्लोर जिल्ह्यात 40 तर बपातला जिल्ह्यात 28 ठीकाणांची निवड झाली आहे.पुन्हा एकदा सर्वेक्षण केल्यानंतर सरकार खाजगी कंपन्या मार्फत या बिचची निर्मिती करणार आहे. यासाठी अनेक कंपन्यांशी बोलणी सुरु आहेत. आंध्रप्रदेश सरकार पर्यटन विकासासाठी 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
