माघार घेतली गहलोतांनी, फावलं सगळं दिग्विजय सिंहांचं….

| Updated on: Sep 29, 2022 | 4:08 PM

सोनिया गांधी यांच्याकडून काँग्रेस पक्षाच्या सर्वोच्च पदासाठी गेहलोत यांची निवड केली होती, मात्र त्यांच्या समर्थक आमदारांच्या बंडखोरीनंतर हायकमांड यांना ती गोष्ट पटली नव्हती.

माघार घेतली गहलोतांनी, फावलं सगळं दिग्विजय सिंहांचं....
Follow us on

नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस अध्यक्ष पदासाठी चाललेली धामधूम आता थोडी मंदावल्याचं चित्र आहे.
मात्र काँग्रेसच्या नव्या अध्यक्षासाठी निवडणुकीपूर्वी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांनी आधीच आता मोठी घोषणा केली आहे. सोनिया गांधी (Sonia gandhi) यांची भेट घेतल्यानंतर गहलोत यांनी सांगितले की, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मी अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

अशोक गहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतल्यानंतर राजस्थानातील राजकीय नाट्यामुळे मला धक्का बसल्याचेही सांगून त्यांनी त्यांची माफीही मागितली आहे.

तर त्याचवेळी के. सी. वेणुगोपालही सोनिया गांधींना भेटली पोहचले होते. त्यांना भेटण्यापूर्वी गहलोत यांनी जोधपूर हाऊसमध्ये काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांचीही भेट घेतली होती. मात्र या बैठकीत सचिन पायलट यांना बोलावण्यात आले नसल्याने काँग्रेसच्या गोटात जोरदार चर्चा सुरु होती.

काँग्रेस अध्यक्ष निवडीपूर्वी गहलोत यांनी सोनिया गांधींची सुमारे दीड तास भेट घेतली. त्यावेळी गहलोत म्हणाले की, मी काँग्रेसमध्ये एक निष्ठावान सैनिक म्हणून काम केले आहे.

काँग्रेसनेही माझ्यावर नेहमीच विश्वास ठेवला आहे. अनेक जबाबदाऱ्या दिल्या आहेत. तर सोनिया गांधींच्या आशीर्वादामुळेच मला तिसऱ्यांदा राजस्थानचा मुख्यमंत्री होण्याचा मानही मिळाला आहे असंही त्यांनी सांगितले.

अशोक गहलोत यांनी सोनिया गांधी यांची भेट घेण्यापूर्वी गहलोत यांनी सोनिया गांधींना काही कागदपत्रं सादर केली आहेत.

त्यामध्ये त्यांनी राजस्थानच्या परिस्थितीबाबत काही गोष्टी सांगितल्या आहेत. आणि त्यावर जे घडले आहे, त्यामुळे मी दुखावलो ही असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सोनिया गांधी यांच्याकडून काँग्रेस पक्षाच्या सर्वोच्च पदासाठी गेहलोत यांची निवड केली होती, मात्र त्यांच्या समर्थक आमदारांच्या बंडखोरीनंतर हायकमांड यांना ती गोष्ट पटली नव्हती. त्यामुळे हा एका दिग्गज नेत्याच्या स्वच्छ कारकिर्दीवर डाग असल्याचेही बोलले जात आहे.

तर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह शुक्रवारी आपला फॉर्म भरणार आहेत, त्यासाठी त्यांनी पक्ष कार्यालयातून उमेदवारी अर्जही घेतला आहे. गहलोत यांच्या नकारानंतर आता दिग्विजय सिंह अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचेही बोलले जात आहे.