
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसची येणाऱ्या 4 ते 6 जुलैदरम्यान एकूण तीन दिवसीय अखील भारतीय प्रांत प्रचार बैठक होणार आहे. दिल्लीतील केशव कुंज येथे ही तीन दिवसीय बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यत: संघटनात्मक विषयावर चर्चा होईल. या बैठकीत कोणताही निर्णय होणार नसून भारतभरातील प्रांतांत संघाच्या कामाची पद्धत तसेच अनुभवांवर चर्चा होणार आहे. या तीन दिवसीय बैठकीत सरसंघचालक मोहन भागवत मार्गदर्शन करणार आहेत.
येत्या 4 ते 6 जुलैदरम्यान होणाऱ्या या तीन दिवसीय बैठकीला सरसंघचालक, सरकार्यवाह यांची विशे,उपस्थिती असेल. तसेच सह सहकार्यवाह, कार्य विभागाचे प्रमुख, संघाशी संबंध असलेल्या वेगवेगळ्या 32 संघटानांचे अखिल भारतीय संघटनमंत्री हजर राहतील.
या तीन दिवसीय बैठकसत्रांविषयी संघाचे अखील भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी सविस्तर माहिती दिली आहे. यावेळी आंबेकर यांच्यासोबत सह प्रचारप्रमुख नरेंद्र ठाकूर, प्रदीप जोशी उपस्थित होते. आंबेकर यांनी सांगितल्यानुसार मार्चनंतर देशभरात आतापर्यंत 100 प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात आले. यात 40 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या स्वयंसेवकांसाठी 75 तर 40 ते 60 वर्षे वय असणाऱ्या स्वयंसेवकांसाठी 25 वर्ग आयोजित करण्यात आले. या सेवा वर्गादरम्यान सेवा विभागासहित वेगवेगळ्या कार्य विभागांचे प्रशिक्षण दिले जाते. स्थानिक प्रकल्पात संघाचे स्वयंसेवक काम करत असतात. तसेच आपत्ती आल्यानंतरही स्वयंसेवक सेवा कार्यात सहभागी होतात.
तीन दिवसीय बैठकीचा ‘शताब्दी वर्ष’ हा मुख्य विषय असणार आहे, असे आंबेकर यांनी सांगितले. शताब्दी वर्षाचा शुभारंग 2 ऑक्टोबर रोजी नागपरूमध्ये होईल. या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत हे उपस्थित असतील. त्यानंतर पुढच्या एका वर्षात शताब्दी वर्षाअंतर्गत वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातील, असेही आंबेकर यांनी सांगितले.