
पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत. भारतानं सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती दिली आहे. तसेच अटारी बॉडर देखील बंद करण्यात आली आहे, तसेच पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून त्यांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तानने देखील व्यापार बंदीची घोषणा केली असून, भारताच्या विमानांसाठी हवाई हद्द बंद करण्यात आली आहे. दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. याच दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे.
भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण असताना दुसरीकडे भारताचा सर्वात जवळचा मित्र असणाऱ्या रशियानं मोठं पाऊल उचललं आहे. रशियानं चीनला अत्याधुनिक ‘एस 400’ हवाई संरक्षण क्षेपणास्त्र पुरवले आहेत. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार रशियानं चीनला जे क्षेपणास्त्र पुरवले आहेत त्यांचा समावेश हा जगातील सर्वोत्तम क्षेपणास्त्रांमध्ये होतो. कोणत्याही प्रकारचा हवेतील मारा हे क्षेपणास्त्र सहज थांबवू शकते.
चीनने 2014 मध्ये ‘एस 400’ हवाई संरक्षण क्षेपणास्त्र खरेदी करण्यासाठी रशियासोबत अब्जआधी डॉलरचा करार केला होता. या कराराच्या तब्बल आकरा वर्षांनंतर रशियानं चीनला ही क्षेपणास्त्र दिली आहेत. रशिया आणि चीनमध्ये झालेल्या या व्यवाहाराने संपूर्ण जगाचं लक्ष आपल्याकडे केंद्रीत केलं आहे. चीनला रशियाकडून ‘एस 400’ हवाई संरक्षण क्षेपणास्त्र मिळाल्यामुळे आता चीनची ताकत आणखी वाढणार आहे.
भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण
दुसरीकडे भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारतानं घेतलेल्या भूमिकेमुळे पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे. पाकिस्तानी नेत्यांकडून युद्धाच्या पोकळ धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे तणाव आणखी वाढला आहे. आमच्याकडे असलेले अणू बॉम्ब हे काय शोभेची वस्तू नाही असं पाकिस्तानच्या रेल्वे मंत्र्यानं म्हटलं आहे. तर आमची सेना सज्ज असून आम्ही युद्धाला तयार असल्याचं त्यांच्या संरक्षण मंत्र्यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानकडून सातत्यानं विखारी वक्तव्य सुरू आहेत.