19 व्या वर्षी मंत्री पण… कोण आहेत बिहारचे नवे मुख्यमंत्री सम्राट चौधरी? वाचा राजकीय प्रवास

Who is Bihar CM Samrat Chaudhari : सम्राट चौधरी हे बिहारचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. भाजप आमदारांच्या बैठकीत त्यांची सभागृह नेते म्हणून निवड करण्यात आली. त्याचा राजकीय प्रवास सविस्तर जाणून घेऊयात.

19 व्या वर्षी मंत्री पण... कोण आहेत बिहारचे नवे मुख्यमंत्री सम्राट चौधरी? वाचा राजकीय प्रवास
Samrat Chaudhary
Image Credit source: Google
| Updated on: Apr 14, 2026 | 5:38 PM

बिहारमधून मोठी बातमी समोर आली आहे, सम्राट चौधरी हे बिहारचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. त्यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपच्या आमदार बैठकीत त्यांची सभागृह नेते म्हणून निवड करण्यात आली. उद्या म्हणजेच 15 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता लोकभवन येथे त्यांचा शपथविधी समारंभ होणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. काल बिहारच्या राज्यपालांच्या सचिवांनी सम्राट यांची भेट घेतली होती. नीतीश कुमार राज्यसभेत गेल्यानंतर बिहारमध्ये मुख्यमंत्रीपद रिक्त झाले होते. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावर कोण बसणार याबाबत बराच काळ चर्चा सुरू होती. पण अखेरीस सम्राट यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यांचा राजकीय प्रवास जाणून घेऊयात.

आरजेडीतून राजकारणाची सुरुवात

बिहारचे नवे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांचा जन्म राजकीय घरात झाला. त्यांचे वडील शकुनी चौधरी हे राज्यातील मोठ्या नेत्यांपैकी एक मानले जातात. सम्राट चौधरी यांनी आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखालीच राजकारणाची सुरुवात केली. ज्या आरजेडी, लालू प्रसाद आणि तेजस्वी यादव यांचा ते आज विरोध करतात, त्याच लालू प्रसाद यादव यांच्या पक्षातून त्यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या पक्षात काम केले आणि आज ते मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले आहेत.

ममता कुमारी यांच्याशी विवाह

16 नोव्हेंबर 1968 रोजी जन्मलेल्या सम्राट चौधरी यांचा विवाह ममता कुमारी यांच्याशी झाला आहे. त्यांच्या वडिलांचे नाव शकुनी चौधरी तर आईचे नाव पार्वती देवी आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांचे वडील शकुनी चौधरी हे समाजवादी नेते म्हणून ओळखले जातात. ते एकेकाळी लालू प्रसाद यादव यांचे जवळचे सहकारी होते. नंतर त्यांनी आपली राजकीय दिशा बदलून नितीश कुमार यांच्यासोबत काम केले.

19 व्या वर्षी मंत्री

सम्राट चौधरी फक्त 19 व्या वर्षी मंत्री बनले होते. मात्र नंतर त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फही करण्यात आले होते. त्यांच्या वयासंबंधीच्या वादामुळे त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी झाली होती. त्या वेळी ते आरजेडी सरकारमध्ये कृषी राज्यमंत्री होते. असेही म्हटले जाते की त्यांच्यासाठी खास विभागही तयार करण्यात आला होता. महत्त्वाची बाब म्हणजे ज्या भारतीय जनता पक्षाने त्यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेतला आहे, त्याच भाजपने त्यावेळी त्यांच्या वयावर आक्षेप घेतला होता. कमी वयामुळे राज्यपालांनी त्यांना पदावरून हटवले होते. मात्र नंतर सम्राट चौधरी भाजपमध्ये सामील झाले आणि त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

बडतर्फीनंतर मुख्यमंत्री

सम्राट चौधरी हे मंत्रिमंडळातून बडतर्फ झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचणारे ते कदाचित पहिलेच नेते असावेत. बिहारमध्ये ते दुसरे असे नेते ठरले आहेत जे आधी उपमुख्यमंत्री होते आणि नंतर मुख्यमंत्री झाले. यापूर्वी फक्त कर्पूरी ठाकूर यांनी हा विक्रम केला होता. मात्र सुशील कुमार मोदी, तार किशोर प्रसाद, विजय कुमार सिन्हा आणि तेजस्वी यादव यांना हा विक्रम करता आलेला नाही. तसेच पहिल्या महिला उपमुख्यमंत्री रेणु देवी यांनाही मुख्यमंत्री होता आले नाही.

अनेक पक्षांमध्ये केले काम

सम्राट चौधरी यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात आरजेडीपासून केली. नंतर ते जनता दल (युनायटेड) मध्ये गेले. 2014 मध्ये नितीश कुमार यांनी जीतन राम मांझी यांना मुख्यमंत्री केल्यावर ते त्यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. नंतर त्यांनी जेडीयू सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.

Follow Us