सापांच्या प्रजनन हंगामाला सुरुवात, या झाडापासून जरा दूरच राहा, सापांची अंडे देण्याची सर्वात आवडती जागा
पावसाळ्याच्या काळात साप हे अधिक सक्रिय असतात. पावसाळा हा त्यांच्या प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे ते अधिक आक्रमक बनतात. पावसाळ्यात साप बिळामध्ये राहत नाही, त्यांचा जमिनीवर मुक्त वावर असतो. काही वनस्पती या अशा असतात, ज्या आपल्या नैसर्गिक रचनेमुळे सापांना आपल्याकडे आकर्षित करतात.

आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात सापांबद्दल एक वेगळंच कुतुहलच असतं, तसेच भीती देखील असते. आपल्या मनात लहानपणापासून एक गैरसमज हा घट्ट चिकटून बसलेला असतो, तो म्हणजे प्रत्येक साप हा विषारीच असतो. त्यामुळे आपण अनेकदा गैरसमजामधून सापांना मारतो. यामुळे दिवसेंदिवस सापांची संख्या कमी होत चालली आहे. सापांची संख्या कमी झाल्यामुळे घुशी सारख्या प्राण्यांच्या संख्येत वाढ होत आहे. सापांना शेतकऱ्यांचा मित्र देखील म्हटलं जातं. त्यामुळे तुम्हाला तुमच्या घराचं गार्डन किंवा कुठेही साप दिसला तर त्याला मारू नका, त्याची माहिती तुम्ही तुमच्या परिसरातील सर्पमित्रांना देऊ शकतात. ते या सापांना पकडून सुरक्षित जागी रेस्क्यू करतील. तसेच तुम्हाला कुठेही साप आढळला तर त्याला पकडण्याचा प्रयत्न करू नका, कारण असं करणं हे चुकीचं आहे. त्या सापाबद्दल म्हणजे तो विषारी आहे की बिनविषारी असं आपल्याला काहीच माहिती नसतं.
भारतामध्ये सापांच्या हजारो प्रजाती आढळून येतात, परंतु त्यामध्ये केवळ हाताच्या बोटावर मोज्याइतक्याच प्रजाती या विषारी आहेत. ज्यामध्ये मण्यार, फुरसे, घोणस, आणि नाग, ज्याला आपण कोबरा असं देखील म्हणतो. या प्रमुख चार विषारी जाती आहे. यांना भारतात बिग फोर असं देखील म्हटलं जातं. विशेष म्हणजे या चारही विषारी प्रजाती महाराष्ट्रात आढळून येतात. जर तुम्हाला कुठेही साप दिसला तर घाबरून न जाता त्याची माहिती सर्पमित्रांना द्यावी.
दरम्यान असे काही झाडं आणि वनस्पती असतात ज्या सापांना आपल्या विशिष्ट नैसर्गिक गुणधर्मामुळे आकर्षित करतात. अनेकदा अशा झाडांखाली तर काही वेळेला झाडांवर सुद्धा सापांचा वावर दिसून येतो. यातीलच एक झाड आहे ते म्हणजे चंदनाचं झाडं. अनेकदा साप या झाडाच्या आसपास आढळून येतात त्याचं मुख्य कारण म्हणजे चंदनाच्या झाडाला बारीक फळं असतात, हे फळं पक्ष्यांना खूप आवडतात. या झाडावर कायम पक्ष्यांचा वावर असतो, त्यामुळे सापांना सहज शिकार उपलब्ध होते, पक्ष्याची अंडी खायला मिळतात. त्यामुळे इथे साप आढळून येतात. तसेच अनेकदा साप या झाडाखाली अंडी देखील घालतात.