तर साप वारंवार घरात येतील; ही चूक नकोच, सर्पतज्ज्ञांनी दिला इशारा
अलिकडच्या काळात सापांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे. अनेकदा सोसायटींच्या आवारामध्ये, बागेमध्ये किंवा कधी-कधी तर थेट घरात देखील साप आढळून येतात. यावर आता सर्पतज्ज्ञांनी महत्त्वाचा इशारा दिला आहे.

काही विशिष्ट प्रजातींच्या सापांची संख्या अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पहायला मिळत आहे. यामध्ये घोणस सारख्या प्रजातीचा समावेश आहे. घोणस हा अतिशय विषारी साप आहे. तो एकाचवेळी 30 ते 40 पिल्लांना जन्म देत असल्यामुळे या सापाची संख्या झपाट्याने वाढत आहे. या सापाची मुख्य शिकार उंदीर आहे, त्यामुळे अनेकदा हा साप उंदराच्या शोधात घरामध्ये देखील घुसतो, तसेच अनेकदा उसाच्या शेतामध्ये देखील हा साप आढळून येतो. घोणस प्रमाणेच आणखी एक दुसरा साप आहे तो म्हणजे मण्यार, मण्यार साप हा शक्यतो रात्रीच्यावेळी शिकारीच्या शोधात बाहेर पडतो. मात्र हा साप देखील अनेकदा मानवी वस्त्यांमध्ये आढळून येतो. या सापाला सायलंट किलर असं देखील म्हटलं जातं. हा साप देखील अतिशय विषारी असतो.
मण्यार, घोणस या सापांप्रमाणेच अनेकदा नाग, धामीण या सारख्या प्रजातीचे साप देखील मानवी वस्त्यांमध्ये आढळून येतात. हे सर्व मुख्यत: शिकारीच्या शोधातच घरात घुसतात. असे साप घरात येऊ नये, यासाठी सर्पमित्रांनी काही सोप्या ट्रिक सांगितल्या आहेत. सर्वात आधी म्हणजे तुमच्या घरात जर उंदरांची संख्या वाढली असेल तर त्यांचा बंदोबस्त करा, कारण जिथे उंदरांची संंख्या अधिक आहे, अशा ठिकाणी साप हमखास आढळून येतो. जर तुमच्या घरात कुठेही छोटे-छोटे छिद्र असतील तर ते सर्वात आधी बंद करा, कारण सापांना स्वत:ला बिळ तयार करता येत नाही. ते अशाच तयार केलेल्या बिळात आश्रय घेतात.
जर तुमच्या घरात कुठेही पक्षाची घरटी असतील तर थोडं सावध राहण्याची गरज आहे. कारण अनेक साप हे उंदरांसोबतच पक्ष्याची देखील शिकार करतात, तसेच त्यांची अंडी देखील खातात. त्यामुळे हे साप तुमच्या घरात घुसण्याची दाट शक्यता असते. अनेकजण ग्रामीण भागात जेवणानंतर उरलेलं भांडी धुतलेलं पाणी हे घराच्या जवळच टाकतात. अशा पाण्यामध्ये अन्नाचे कण असतात, त्यामुळे अनेकदा उंदीर या अन्नाच्या शोधात तिथे येतात, आणि साप उंदराच्या शिकारीसाठी त्यांच्या पाठीमागे येतात. त्यामुळे याची देखील काळजी घेतली पाहिजे, असं सर्पतज्ज्ञ सांगतात.