
अमेरिका,इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. अमेरिका आणि इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत इराणंच प्रचंड नुकसान झालं आहे. मात्र तरी देखील इराणने माघार घेतलेली नाहीये. इराणकडून मिसाईल हल्ले सुरूच आहेत. इराणच्या मिसाईल हल्ल्यांमुळे इस्त्रायलचे अनेक भाग उद्ध्वस्त झाले आहेत. तर दुसरीकडे इराणने आखाती देशांमध्ये असलेल्या अमेरिकन सैन्य तळांना देखील लक्ष्य केलं आहे. इराणने अमेरिकेचे अनेक सैन्य तळं उद्ध्वस्त केले आहेत. या युद्धात आतापर्यंत अमेरिकेचा प्रचंड पैसा खर्च झाला आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दुसरीकडे इराणने या युद्धाच्या पार्श्वभूमीवर स्ट्रेट ऑफ होमूर्ज बंद केल्यानं जगभरात मोठं इंधन संकट निर्माण झालं आहे. त्याचा देखील आता अमेरिकेवर चांगलाच दबाव आल्याचं पहायला मिळत आहे. एकीकडे अमेरिका युद्धात अडकलेली असताना दुसरीकडे मात्र आता अमेरिकेवर आणखी एक मोठं संकट आलं आहे. या संकटामुळे अमेरिकेत हाहाकार उडाला आहे.
अमेरिकेच्या अनेक भागांमध्ये हंगामी वादळानं धुमाकूळ घातला आहे. एका रिपोर्टनुसार अमेरिकेच्या अनेक भागांमध्ये वाऱ्याचा प्रचंड वेग आणि तुफान बर्फवृष्टीमुळे सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. अमेरिकेच्या पूर्व समुद्रकिनार्यावर या वादळाचा सर्वाधिक धोका आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान विभागाकडून येथील नागरिकांसाठी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांना सुरक्षितस्थळी आसरा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या वादळाचा प्रभाव पुढील 48 तासापर्यंत कायम राहू शकतो, त्यानंतर हे वादळ हळूहळू कमी होईल, मात्र त्यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं, असा इशाराही हवामान विभागाच्या वतीनं यावेळी देण्यात आला आहे.
1800 उड्डाणं रद्द
समोर आलेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या उत्तर भागामध्ये तापमान एवढं कमी झालं आहे की, पावसाच्या पाण्याचं रूपांतर बर्फामध्ये झालं आहे. या भागात सुमारे 15 सेंटीमीटरपेक्षा अधिक बर्फ जमा होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या विस्कॉन्सिन आणि मिशनिगनच्या काही भागांमध्ये तर 61 सेंटिमीरटपेक्षा अधिक बर्फ जमा झाला आहे. दरम्यान या वादळाचा अमेरिकेच्या हवाई वाहतुकीवर प्रचंड परिणाम झाला आहे. फ्लाइटअवेअर ने दिलेल्या माहितीनुसार या वादळाच्या पार्श्वभूमीवर तब्बल 1800 उड्डाण रद्द करण्यात आली आहेत, तर 1400 विमानांच्या फेऱ्या या विलंबाने धावत आहेत.