Sonali Phogat: सोनाली फोगट यांना पीए सुधीर आणि सुखविंदर यांनी जबरदस्तीने दिले होते ड्रग्ज, गोव्याच्या पोलीस महासंचालकांचा दावा

| Updated on: Aug 26, 2022 | 4:51 PM

ड्रग्जचा ओव्हरडोस झाल्यामुळे सोनाली यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर दोघेही सोनाली यांना घेऊन लेडीज वॉशरुममध्ये गेले होते आणि दोन तास तिथेच बसून राहिल्याचेही या आरोपींनी कबूल केले आहे.

Sonali Phogat: सोनाली फोगट यांना पीए सुधीर आणि सुखविंदर यांनी जबरदस्तीने दिले होते ड्रग्ज, गोव्याच्या पोलीस महासंचालकांचा दावा
सोनाली फोगाट यांना जबरदस्तीने दिले होते ड्रग्ज
Image Credit source: social media
Follow us on

पणजी-हिसार- हरियाणात भाजपा नेत्या सोनाली फोगाट (Sonali Phogat)यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर आता गोवा पोलिसांनी (Goa Police) मोठा दावा केला आहे. गोव्यात सोनाली यांना जबरदस्तीने ड्रग्ज देण्यात (forcefully given drugs)आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हे ड्रग्ज त्यांना पीए सुधीर सांगवान आणि सुखविंदर यांनी दिल्याची माहिती आहे. या दोघांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून, त्यांनी पोलिसांपुढे हे कबूल केल्याची माहिती पोलीस महासंचालकांनी दिली आहे. गोव्याचे पोलीस महासंचालक जसपाल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर आणि सुखविंदर यांनी २२ ऑगस्ट रोजी रात्री सोनाली यांना जबरदस्तने ड्रग्ज दिले होते, हे कबूल केले आहे. पेयामध्ये केमिकल टाकून सोनाली यांना देण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. ड्रग्जचा ओव्हरडोस झाल्यामुळे सोनाली यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर दोघेही सोनाली यांना घेऊन लेडीज वॉशरुममध्ये गेले होते आणि दोन तास तिथेच बसून राहिल्याचेही या आरोपींनी कबूल केले आहे.

चुलतभावासह मुलीने दिला मुखाग्नी

दुसरीकडे सोनाली फोगाट यांच्या मृतदेहावर शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास हिसारमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची मुलगी यशोधरा आणि त्यांचा चुलत भाऊ यांनी एकत्रित त्यांच्या मृतदेहाला मुखाग्नी दिला. या वेळी सोनाली अमर रहे, सोनाली यांची हत्या करणाऱ्यांना फासावर लटकवा, अशा घोषणा देण्यात येत होत्या. काही दिवसांपूर्वीच काँग्रेस सोडून भाजपात आलेले कुलदीप बिश्नोई हेही सोनाली यांना श्रद्धांजली देण्यासाठी स्मशानभूमीत आले होते.

अंत्यदर्शन ते अंत्यसंस्कार

त्यापूर्वी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास सोनाली यांचे पार्थिव सिव्हिल रुग्णालयातून अंत्यदर्शनासाठी ढंढूप फार्महाऊसवर आणण्यात आले होते. त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा ऋषीनगर स्मशानभूमीपर्यंत निघाली. यावेळी सोनाली यांची एकलुती एक मुलगी यशोधरा हिने त्यांच्या पार्थिव शरिराला खांदा दिला होता. सन्मान म्हणून सोनाली यांच्या पार्थिवावर भाजपाचा झेंडाही पांघरण्यात आला होता.