तिने दोन सख्ख्या भावांशी लग्न केलं, आता मुलीचे वडील कोण? नेटकऱ्यांना पडला प्रश्न
हिमाचल प्रदेशातील सिरमौर येथे दोन भावांशी विवाह केलेल्या सुनीताने आपला आतापर्यंतचा अनुभव सकारात्मक असल्याचे सांगितले. तसेच मुलगी झाल्यानंतर तिच्या वडिलांचे नाव काय आहे? हे देखील तिने सांगितले आहे.

हिमाचल प्रदेशच्या सिरमौरमधील दोन सख्ख्या भावांशी लग्न केलेल्या सुनीता नेगी यांची कहाणी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एका मुलाखतीचे काही भाग व्हायरल झाल्यानंतर सुनीता, कपिल आणि प्रदीप या जोडीच्या किस्स्यांवर इंटरनेटवर चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, सुनीता यांनी लग्नानंतर सुमारे दीड वर्षांनी आपला अनुभव कसा होता हे सांगितले आहे. त्या तिघांना आता एक मुलगीही झाली आहे. या मुलीचे वडील कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
सिरमौरच्या शिलाई गावात कपिल-प्रदीप आणि सुनीता यांच्याशिवाय अशा अनेक ‘जोडपी’ आहेत. खरे तर हिमालयाच्या कुशीत अनेक परंपरा शतकानुशतके प्रचलित आहेत, ज्यांबद्दल जगाला फारसे माहिती नाही. यापैकीच एक म्हणजे हाटी समुदायाची जोडीदारा प्रथा. याअंतर्गत दोन किंवा त्याहून अधिक सख्ख्या भावांची एकच सामायिक पत्नी असते. जुलै २०२५ मध्ये हे लग्न देशभर चर्चेचा विषय बनले होते. शिकले-सवरलेले आणि संपन्न कुटुंबातील तिघांचा सामायिक कुटुंब स्थापन करण्याचा निर्णय सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रदीप आणि कपिल राहतात ते शिलाई गाव या प्रकारच्या लग्नांसाठी प्रसिद्ध आहे. यापूर्वीही येथे अनेक लोकांनी या प्रथेनुसार लग्न केले आहे. काही महिलांना तर येथे तीन-चार पती आहेत.
मुलीचे वडील कोण?
हिमाचलमध्ये सरकारी नोकरी करणारे प्रदीप नेगी, परदेशात शेफची नोकरी करणारे कपिल नेगी आणि शिकलेल्या सुनीता यांचे लग्न झाल्यावर त्यांचे फोटो आणि कहाणी देशभर चर्चेचा विषय बनली. टीव्ही आणि वर्तमानपत्रांत त्यांच्या बातम्या आल्या. आता सोशल मीडिया इन्फ्लुएंसर निशु तिवारी यांनी सुनीता आणि त्यांच्या पतींची मुलाखत घेतली आहे. यात सुनीता यांना आतापर्यंतच्या अनुभवाबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या, “आयुष्य खूप चांगले चालले आहे.” सुनीता यांनी सांगितले की, त्यांची एक मुलगीही आहे. मुलीला कोणत्या वडिलांचे नाव मिळेल? या प्रश्नावर सुनीता म्हणाल्या, “मोठ्या वडिलाचे नाव असेल. पण लहान असलेल्या पतीने दत्तक घेऊन आपले नावही देता येते.”
खरं तर जोडीदार प्रथेचे नियम परंपरेनुसार ठरलेले आहेत आणि त्यानुसार पहिल्या संततीचे वडील मोठा भाऊ मानला जातो. याच मुलाखतीदरम्यान प्रदीप आणि कपिल यांच्या पत्नीने सांगितले की, हे लव्ह मॅरेज आहे आणि दोघांशीही ती सारखेच प्रेम करते.
