Neet PG Exam Date: नीट पीजीची परीक्षा 3 ऑगस्ट रोजी, सर्वोच्च न्यायालयाकडून परवानगी

Neet PG Exam Date: सर्वोच्च न्यायालयाने ३० मे रोजी नीट पीजी परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेण्याचे आदेश दिले होते. परंतु त्यासाठी नॅशनल बोर्ड ऑफ एग्जामिनेशन इन मेडिकल सायन्सकडून वेळ मागण्यात आला. त्यानुसार आता ३ ऑगस्ट रोजी परीक्षा घेण्यास मंजुरी दिली.

Neet PG Exam Date: नीट पीजीची परीक्षा 3 ऑगस्ट रोजी, सर्वोच्च न्यायालयाकडून परवानगी
Image Credit source: टीव्ही 9 भारतवर्ष
| Updated on: Jun 06, 2025 | 1:05 PM

नीट पीजी परीक्षा संदर्भात सर्वोच्च न्यायालयात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. या परीक्षेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यानुसार ३ ऑगस्ट रोजी एकाच शिफ्टमध्ये ही परीक्षा होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात नॅशनल बोर्ड ऑफ एग्जामिनेशन इन मेडिकल सायन्सकडून (NBEMS) आलेला अर्ज मंजूर केला आहे. सिंगल शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यासाठी तारीख पुढे ढकलावी लागत असल्याचे वकिलांनी न्यायालयात सांगितले. त्यानुसार परीक्षा पुढे ढकलण्यात आली.

एनबीईएमएसने मागितला वेळ

नीट पीजीची परीक्षा १५ जून रोजी घेण्यात येणार होती. परंतु ही परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेण्याची मागणी न्यायालयात झाली. त्यानंतर न्यायालयानेही एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्याचे सांगितले. त्यावेळी NBEMS म्हटले की, परीक्षा एका शिफ्टमध्ये घेण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये अनेक बदल करावे लागणार आहे. तसेच लॉजिस्टिक तयारी करण्यासाठी वेळ लागणार आहे. यासंदर्भात परीक्षेची जबाबदारी दिलेल्या टीसीएस कंपनीसोबत आमची बोलणी झाली. त्यांच्याकडूनही १५ जून रोजी एका शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यास असमर्थता व्यक्त करण्यात आली. एनबीईने म्हटले होती की, परीक्षेसाठी जवळपास 2 लाख 50 हजार उमेदवार आहेत. एका शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यासाठी परीक्षा केंद्र वाढवावी लागणार आहे. ही संख्या 500 करावी लागणार आहे.

एका शिफ्टमध्ये परीक्षेसाठी पुन्हा एक वेळा वेबसाइटवर अर्जाची विंडो ओपन करावी लागणार आहे. उमेदवारांना आपल्या पसंतीनुसार शहर निवडण्याची संधी द्यावी लागणार आहे. त्यानंतर परीक्षा केंद्रांचे वाटप करावे लागणार आहे. त्यामुळे परीक्षेचे आयोजन करण्यासाठी अधिक वेळ लागणार आहे. त्यानंतर आता ३ ऑगस्ट रोजी एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली.

सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी ३० मे रोजी नीट पीजी परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेण्याचे आदेश दिले होते. दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेतली जात असल्यामुळे सर्वांना समान संधी मिळत नाही, असे कोर्टाने म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर १५ जून रोजी होणारी परीक्षा स्थगित करण्यात आली होती.