मोठी बातमी! नांदेड अपघाताची पुनरावृत्ती; कार विहिरीत कोसळली, 10 जणांचा मृत्यू, चार जण गंभीर जखमी

भीषण अपघात घडला आहे. या अपघातामध्ये दहा जणांचा मृत्यू झाला असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत, भरधाव कार विहिरीत कोसळली.

मोठी बातमी! नांदेड अपघाताची पुनरावृत्ती; कार विहिरीत कोसळली, 10 जणांचा मृत्यू, चार जण गंभीर जखमी
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 27, 2025 | 8:12 PM

मध्य प्रदेशच्या मंदसौर जिल्ह्यात रविवारी भीषण अपघात घडला आहे. या अपघातामध्ये दहा जणांचा मृत्यू झाला असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत, भरधाव वेगात असलेल्या कारने आधी दुचाकीला धडक दिली, त्यानंतर ही कार विहिरीत जाऊन कोसळली, या घटनेत दहा जणांचा मृ्त्यू झाला आहे. दरम्यान अपघातानंतर आरडा-ओरड ऐकून स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली, स्थानिकांनी या अपघाताची माहिती पोलिसांना दिली आणि बचाव कार्याला सुरुवात केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी देखील तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. 14 जणांना विहिरीतून बाहेर काढण्यात आले, त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र यातील दहा जणांना तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केलं तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला आहे, आधी ही अनियंत्रित झालेली कार एका दुचाकीला जाऊन धडकली. त्यानंतर ती रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळली. या वाहनामध्ये एकूण 14 प्रवाशी होते. यातील दहा लोकांचा मृत्यू झाला आहे, तर चार जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही कार सीएनजीवर होती, जेव्हा या वाहनाचा अपघात झाला तेव्हा त्यातील गॅस लिक झाल्यामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण झाला.

विहिरीमध्ये गॅसची गळती झाल्यामुळे कोणालाही पाण्यात उतरता येणं शक्य नव्हतं. त्यानंतर ऑक्सिजन सिलिंडरच्या मदतीनं एसडीआरएफचे जवान या विहिरीत उतरले. विहिरीतून लोकांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर या गाडीला देखील विहिरीतून बाहेर काढलं. चालकाचं कारवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्यातील अलेगावमध्ये देखील असाच एक भीषण अपघात झाला होता, या अपघातामध्ये ट्रॅक्टर विहिरीत कोसळून सात महिला मजुरांचा मृत्यू झाला होता, त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे.