बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण विमान दुर्घटना टळली; इंडिगोची दोन विमाने आली होती समोरासमोर

| Updated on: Jan 20, 2022 | 2:06 AM

भीषण विमान दुर्घटना टळली, त्यादिवशी बंगळुरूच्या विमानतळावरील एक धावपट्टी बंद होती. दोन धावपट्ट्यांपैकी दक्षिण धावपट्टी बंद होती. मात्र त्याची दक्षिण टॉवर कंट्रोलरला कल्पना देण्यात आली नव्हती. सर्व विमानांची उत्तर धावपट्टीवरूनच ये-जा (टेक ऑफ आणि लँडिंग) सुरू होती.

बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण विमान दुर्घटना टळली; इंडिगोची दोन विमाने आली होती समोरासमोर
बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण विमान दुर्घटना टळली
Follow us on

बंगळुरू : बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हवाई हद्दीत नुकतीच एक भीषण विमान दुर्घटना थोडक्यात टळली. हवेत तीन हजार फूट उंचीवर इंडिगो एअरलाईन्सची दोन विमाने एकाच हवाई मार्गावर समोरासमोर आली होती. त्यामुळे या दोन विमानांची टक्कर होण्याचा धोका निर्माण झाला होता. मात्र याचदरम्यान रडार कंट्रोलरने प्रसंगावधान दाखवले आणि भीषण दुर्घटना घडण्याचा धोका टळला. या घटनेने विमान सुरक्षेतील हलगर्जीपणा उघड झाल्याने विमान वाहतूक महासंचालनालयाने(DGCA) याची गंभीर दखल घेऊन सखोल चौकशी करून कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. (Terrible plane crash averted at Bangalore International Airport)

9 जानेवारीच्या सकाळी बंगळुरू ते कोलकात्ता आणि बंगळुरू ते भुवनेश्वर ही दोन विमाने हवेत समोरासमोर आली होती. यावेळी रडार कंट्रोलर लोकेश चंद्रा यांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे दोन विमानांतील एकूण 426 प्रवासी बालबाल बचावले. इंडिगो एअरलाईन्सच्या दोन देशांतर्गत विमानांची हवेत टक्कर टळल्याने मोठा अपघात टळला. याबाबत डीजीसीएचे प्रमुख अरुण कुमार यांनी विमानतळ प्राधीकरण या घटनेची चौकशी करीत असून दोषी आढळलेल्या कर्मचारी-अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले. अजूनतरी इंडिगो एअरलाईन्स आणि एएआयने या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

बंगळुरूच्या विमानतळावरील एक धावपट्टी बंद होती

भीषण विमान दुर्घटना टळली, त्यादिवशी बंगळुरूच्या विमानतळावरील एक धावपट्टी बंद होती. दोन धावपट्ट्यांपैकी दक्षिण धावपट्टी बंद होती. मात्र त्याची दक्षिण टॉवर कंट्रोलरला कल्पना देण्यात आली नव्हती. सर्व विमानांची उत्तर धावपट्टीवरूनच ये-जा (टेक ऑफ आणि लँडिंग) सुरू होती. अशा स्थितीत सकाळी दक्षिण धावपट्टीवरील विमान उड्डाणांवर नियंत्रण ठेवणार्‍या एटीसीने कोलकात्ताला जाणार्‍या विमानाला उड्डाणासाठी ग्रीन सिग्नल दाखवला, याचवेळी उत्तर टॉवर कंट्रोलरने भुवनेश्वरच्या विमानाला ग्रीन सिग्नल दिला. त्यामुळे दोन्ही देशांतर्गत विमाने केवळ पाच मिनिटांच्या फरकाने हवेत झेपावली आणि तीन हजार फूट उंचीवर गेल्यावर ही दोन्ही विमाने समोरासमोर आली होती.

विमानांमधील एकूण 426 प्रवासी बालंबाल बचावले

डीजीसीएच्या प्राथमिक अहवालात म्हटले आहे की दक्षिण आणि उत्तर टॉवर नियंत्रकांनी समन्वयाशिवाय विमानांना उड्डाणासाठी सिग्नल दाखवला. धावपट्टी बंद झाल्यानंतर हवाई वाहतूक नियंत्रकांमध्ये समन्वयाचा अभाव होता, असे घटनेच्या प्राथमिक चौकशी अहवालात म्हटले आहे. दोन्ही विमानांना एकाच दिशेने उड्डाण करण्याची परवानगी देणे ही सुरक्षेतील गंभीर चूक आहे, असे डीजीसीएच्या वरिष्ठ सूत्रांनी म्हटले आहे. बंगळुरू-कोलकाता विमानामध्ये 176 प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्स होते, तर बंगळुरू-भुवनेश्वर विमानामध्ये 238 प्रवासी आणि सहा क्रू सदस्य होते. म्हणजेच दोन्ही विमानांमध्ये एकूण 426 प्रवासी होते. दुर्घटना टळल्याचे समजल्यानंतर त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. (Terrible plane crash averted at Bangalore International Airport)

इतर बातम्या

तामिळनाडूत सहा महिन्यांच्या गर्भवती शाळकरी मुलीचा मृत्यू, प्राचार्य आणि वसतिगृहाच्या वॉर्डनला अटक

लहान मुलांच्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवल्याचा आरोप; केंद्र सरकारकडून चॅनलला नोटीस