या 5 सापांकडे असते सुपरपावर, शक्तीपेक्षा करतात बुद्धीचा वापर, चौथा तर फारच घातक

आपल्यापैकी सर्वांनाच सापाची भीती वाटत असते, आज आपण अशा पाच सापांची महिती घेणार आहोत, ज्यांना स्वत:च्या बचावासाठी निसर्गानं एक वेगळंच वरदान दिलं आहे. हे साप शत्रूंना पराभूत करण्यासाठी शक्तीचा नाही तर आपल्या बुद्धीचा वापर करतात.

या 5 सापांकडे असते सुपरपावर, शक्तीपेक्षा करतात बुद्धीचा वापर, चौथा तर फारच घातक
snake
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 14, 2026 | 8:33 PM

साप म्हटलं की आपल्या अंगावर भीतीनं काटा उभा राहतो. आजही सापांबद्दल अनेक गैरसमज आहेत. याच गैरसमजामुळे सापाच्या अनेक प्रजाती आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. खरं तर साप हा शेतकऱ्यांचा मित्र असतो. ज्या भागांमध्ये सापांची संख्या कमी असते, त्या भागांमध्ये उंदरांची संख्या वाढते, उंदीर शेतकऱ्यांचं पीक नष्ट करतो. उंदीर हे सापाचं मुख्य अन्न असतं, त्यामुळे ज्या भागांमध्ये सापांची संख्या जास्त त्या भागातील उंदिरांची संख्या नियंत्रणात राहते, त्यामुळे सापाला शेतकऱ्यांचा मित्र म्हटलं जातं. आज आपण अशा काही सापांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, ज्या सापांना आपला बचाव करण्यासाठी निसर्गाकडून आश्चर्यकारक वरदान लाभलं आहे. हे साप शत्रूंना पराभूत करण्यासाठी शक्तीचा कमी आणि आपल्या बुद्धीचा जास्त वापर करतात. त्यामुळे हे साप आपल्या शत्रूंना सहज चकमा देऊ शकतात.

हॉगनोज साप – सापाच्या ज्या काही प्रजाती आहेत, त्यातील बुद्धिमान प्रजातीमध्ये या सापांचा समावेश होतो. जेव्हा या सापाला आपल्यावर काही संकट आलं आहे, असं कळतं तेव्हा तो आधी आपल्या शत्रूला घाबरवण्याचा प्रयत्न करतो. मात्र जेव्हा शत्रू आपल्यापेक्षा बलवान आहे, तो आपल्याला घाबरत नाही असं जेव्हा या सापाच्या लक्षात येतं, तेव्हा हा साप मृत्यूचं सोंग करतो. म्हणजे हा साप उलटा एकदम शांत झोपतो आणि आपली जीभ बाहेर काढतो. त्यामुळे शत्रूला वाटतं की हा साप मेला आहे, मात्र संधी मिळताच हा साप धूम ठोकतो.

स्कारलेट किंग स्नेक – हा साप थोडा सुद्धा विषारी नसतो, मात्र त्याच्या शरीराची रचनाच अशी असते की, तो अतिप्रचंड विषारी असलेल्या कोरल स्नेकसारखा दिसतो. त्यामुळे शत्रू या सापाच्या आसपास देखील भटकत नाही. तो आपल्या बचावासाठी आपल्या शरीराचा उपयोग करतो.

बोआ कंस्ट्रिक्टर – बोआ कंस्ट्रिक्टर हा साप दुरूनच आपल्या शिकारीचा अंदाज घेऊ शकतो. या सापामध्ये विशिष्ट प्रकारचं सेंसर असतं. या सेंसरमुळे त्याला ठराविक अंतरावरून आपल्या शिकारीची चाहुल लागते.

रॅटल स्नेक – या सापाची शिकार करणं त्याच्या शत्रूसाठी सर्वात अवघड गोष्ट आहे. कारण या सापाच्या शरीराची रचनाच अशी असते की वातावरणात अगदी 0.50 सेल्सिअस तापमानाची जरी वाढ झाली तरी या सापाला ते जाणवतं, त्यामुळे कितीही अंधार असला तरी हा साप बरोबर अंदाज घेऊन शिकार करतो, तसेच यामुळे तो आपल्या शत्रूपासून स्वत:च संरक्षण करतो.

स्पिटिंग कोबरा – हा देखील एक अतिशय बुद्धिमान साप आहे. हा साप जेव्हा त्याला धोका जाणवतो, तेव्हा तो कधीही आपली नजर आपल्या शत्रूच्या डोळ्यावरून हटू देत नाही. संधी मिळताच तो आपल्या विषाचा स्प्रे आपल्या शत्रूच्या डोळ्यत मारतो, यामुळे थोडावेळ डोळ्याची आग होते, जळजळ होते, संधी मिळताच हा साप तिथून पळून जातो.

 

Follow Us