ला इलाहा इल्लल्लाह…, सुनेच्या विजयासाठी भाजपच्या दिग्गज नेत्याने भर प्रचारसभेत वाचला कलमा
मोठी बातमी समोर येत आहे, सून निवडणूक लढवत आहे, सुनेच्या निवडणूक प्रचारासाठी आयोजित केलेल्या एका प्रचार सभेत सातवेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या आणि माजी मंत्री असलेल्या भाजप नेत्याने कलमा वाचला आहे.

भारतीय जनता पार्टीच्या दिग्गज नेत्याने प्रचार रॅलीमध्ये चक्क कलमा वाचल्याचं पहायला मिळालं. सध्या हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानमधून सात वेळा आमदार म्हणून निवडून आलेले राजेंद्र राठोड यांनी नुकताच राजस्थानच्या चुरूमध्ये आयोजित एका प्रचारसभेत कलमा वाचला आहे. राजेंद्र राठोड यांची सून कनिका सिंह या चुरू जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत आहेत. तर त्यांचा मुलगा पराक्रम राठोड हे देखील चुरूच्या वॉर्ड क्रमांक 39 मधून जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहेत. दरम्यान राजेंद्र राठोड यांची सून ज्या वार्डामधून ही निवडणूक लढवत आहेत, त्या वार्डात मोठ्या संख्येनं मुस्लिम मतदान आहे.
पिथीसर गावात या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रचार सभेला संबोधित करताना राजेंद्र राठोड यांनी म्हटलं की, माझं असं म्हणणं आहे की भगवान एकच आहे, आणि त्यानंतर त्यांनी कलमा वाचला. राजेंद्र राठोड यांनी कलमा वाचताच या सभेला उपस्थित असलेल्या नागरिकांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत केलं. एवढंच नाही तर त्यांनी या प्रचार सभेत महात्मा गांधी यांच्या प्रार्थनेच्या देखील काही ओळी म्हटल्या. ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम, सबको सद्बुद्धि दे भगवान। जात-पात पूछे न कोई, हरि को भजे सो हरि का होई।’ अशी प्रार्थना देखील त्यांनी यावेळी म्हटली. तसेच आपण सर्व एक आहोत, आणि आपल्या धमण्यांमध्ये जे रक्त वाहत आहे, ते देखील एकच असल्याचं त्यांनी म्हटलं.
राठोड यांनी पुढे बोलताना असं देखील म्हटलं की, मला हे बोलताना कोणताही संकोच वाटत नाही की आजपर्यंत मी केवळ माणुसकी आणि प्रेमाचाच प्रसार केला आहे. मी कधीही द्वेष पसरवला नाही. मात्र दुसरीकडे यावर प्रतिक्रिया देताना राजस्थानचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष मदन राठोड यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राजेंद्र राठोड यांनी जे काही म्हटलं तो कलमा नव्हता, मला कलमा माहिती आहे, ती एक वेगळी गोष्ट आहे, परंतु लोकांना माहिती नसल्यामुळे लोक त्यालाच कलमा म्हणत आहेत, मला कलमाचा एक एक शब्द लक्षात आहे, अशी प्रतिक्रिया यावर मदन राठोड यांनी दिली आहे.