त्रिवेंद्र सिंह रावत यांचा अखेर राजीनामा, उत्तराखंडमधील भाजपचा पुढचा चेहरा कोण?

त्रिवेंद्र सिंह रावत यांनी अखेर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्रिवेंद्र सिंह रावत यांनी राज्यपाल बेबी रानी मौर्या यांची राजभवनात भेट घेतली आणि आपला राजीनामा त्यांच्याकडे सोपवला.

त्रिवेंद्र सिंह रावत यांचा अखेर राजीनामा, उत्तराखंडमधील भाजपचा पुढचा चेहरा कोण?
| Updated on: Mar 09, 2021 | 4:53 PM

नवी दिल्ली : उत्तराखंडच्या राजकारणात मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. विद्यमान मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी अखेर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्रिवेंद्र सिंह रावत यांनी राज्यपाल बेबी रानी मौर्या यांची राजभवनात भेट घेतली आणि आपला राजीनामा त्यांच्याकडे सोपवला. त्यामुळे आता रावत यांच्या राजी भाजपचा उत्तराखंडमधील नवा चेहरा कोण असणार? याबाबत चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान, बुधवारी नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.(Trivendra Singh Rawat finally resigns as Uttarakhand Chief Minister)

राजीनाम्यानंतर रावत यांची पहिली प्रतिक्रिया

“पक्षाने मला 4 वर्षे जनतेची सेवा करण्याची संधी दिली. मी विचारही केला नव्हता की मला ही संधी मिळेल. आता पक्षानं एखाद्या नव्या चेहऱ्याला मुख्यमंत्री म्हणून संधी देण्याचा निर्णय घेतला आहे”, अशी प्रतिक्रिया रावत यांनी राजीनामा दिल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.

मुख्यमंत्रीपदासाठी कोणती नावं चर्चेत?

दरम्यान, उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदासाठी सध्या भाजपकडून 4 नावं चर्चेत आहेत. त्यात सतपाल महाराज, रमेश पोखरियाल निशंक, अजय भट्ट आणि धन सिंह रावत यांच्या नावांचा समावेश आहे. भाजपकडून रमन सिंह आणि दुष्यंत गौतम यांना उत्तराखंडमध्ये पर्यवेक्षक म्हणून पाठवण्यात आलं आहे. हे 2 नेते भाजपचा विधानसभेतील नेता निवडतील.

2 दिवसांत काय घडलं?

तत्पूर्वी आज त्रिवेंद्र सिंह रावत दिल्लीवरुन देहरादूनला परतले. सोमवारी त्यांनी दिल्लीमध्ये भाजप पर्यवेक्षक दल आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पर्यवेक्षकांच्या बैठकीत त्रिवेंद्र सिंह रावत यांच्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

सोमवारी अचानक भाजपच्या कोअर ग्रुपची बैठक पार पडली. या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह आणि संघटनेचे सरचिटणीस बी.एल. संतोष उपस्थित होते. या बैठकीत केंद्रीय पर्यवेक्षकाच्या रुपात पक्षाचे उपाध्यक्ष आणि उत्तराखंडचे प्रभारी दुष्यंत गौतम उपस्थित होते. दरम्यान, या बैठकीत नेतृत्व बदलाच्या विषयावर कुठलीही चर्चा झाली नसल्याचं सांगितलं जात आहे.

त्रिवेंद्र सिंह रावतांच्या जागी कुणाला संधी ?

रावत यांच्या जागी धन सिंह रावत किंवा सतपाल महाराज यांच्या नावाची चर्चा सुरु असल्याचं कळतंय. या दोन नावांबाबत सर्व आमदारांच्या सहमतीवर काम सुरु आहे. जर या दोन्ही नावांवर एकमत झालं नाही तर केद्र सरकारकडून नैनीतालचे लोकसभा खासदार अजय भट्ट आणि राज्यसभा खासदार अनिल बलूनी यांचं नाव पुढे केलं जाण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित बातम्या :

उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, त्रिवेंद्र सिंह रावतांच्या जागी कुणाला संधी ?

उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, त्रिवेंद्र सिंह रावत थेट जे.पी. नड्डांच्या भेटीला

Trivendra Singh Rawat finally resigns as Uttarakhand Chief Minister