थलपती विजय यांनी आईवडिलांविरोधातच केला होता खटला; नेमकं काय घडलं होतं?

तमिळनाडूच्या राजकारणात थलपती विजय यांच्या पक्षाने मोठं वादळ आणलं असलं तरी त्यांना आधी राजकारणात काहीच रस नव्हता. इतकंच नव्हे तर राजकीय पक्षावरून विजय यांनी त्यांच्याच आईवडिलांविरोधात खटला दाखल केला होता.

थलपती विजय यांनी आईवडिलांविरोधातच केला होता खटला; नेमकं काय घडलं होतं?
थलपती विजय आणि त्यांचे आईवडील
Image Credit source: Instagram
| Updated on: May 05, 2026 | 9:55 AM

तमिळनाडूमध्ये विजय यांच्या ‘टीव्हीके’ पक्षाच्या झंझावातात मुख्यमंत्री आणि सत्ताधारी द्रमुकचे प्रमुख स्टॅलिन यांनाच पराभवाचा धक्का बसला आहे. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुण पिढीने विजय यांना पसंती दिली. विजय यांनी पेरंबूर आणि तिरुचिरापल्ली पूर्व या दोन्ही मतदारसंघांतून विजय मिळवला आहे. त्यांच्या पक्षाला 107 जागा मिळाल्या असून सरकार स्थापनेसाठी छोट्या पक्षांना बरोबर घ्यावं लागेल, असं चित्र आहे. पक्ष स्थापन झाल्याच्या अवघ्या दोन वर्षांत विजय यांना घवघवीत यश मिळालं असलं तरी त्यांना आधीपासूनच राजकारणात यायचं नव्हतं. सुरुवातीला त्यांना राजकारणात रस नव्हता. त्यामुळे जेव्हा त्यांच्या आईवडिलांनी त्यांना न सांगता पक्षाचा भाग बनवला, तेव्हा त्यांनी थेट आईवडिलांसह 11 लोकांवर खटला दाखल केला होता.

नेमकं काय होतं प्रकरण?

2020 मध्ये विजय यांचे वडील एस. ए. चंद्रशेखर यांनी राजकीय पक्षाची स्थापना करत त्याच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू केली होती. विजय मक्कल अय्यकम (व्हीएमआय) असं या पक्षाचं नाव होतं. या पक्षाचे महासचिव विजय यांचे वडील बनले आणि आई शोभा यांना खजिनदार बनवण्यात आलं होतं. या राजकीय पक्षाची सुरुवात करण्यासाठी विजय यांच्या वडिलांनी मुलाची कोणतीच परवानगी घेतली नव्हती. सप्टेंबर 2021 मध्ये विजय यांनी व्हीएमआयपासून स्वत:ला वेगळं केलं. वडिलांनी मला त्यांच्या योजनांबद्दल स्पष्ट माहिती दिली नव्हती, असा खुलासा त्यांनी केला होता. स्वत:ला पार्टीपासून वेगळं केल्यानंतर त्यांनी थेट आईवडिलांसह 11 लोकांविरुद्ध खटला दाखल केला होता. त्यानंतर हा पक्ष भंग करण्यात आला होता.

विजय यांचे वडील दिग्दर्शक असून आई पार्श्वगायिका आहे. विजय यांनी बालकलाकार म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यांच्या करिअरमधील पहिल्या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन वडिलांनीच केलं होतं. आज थलपती विजय हे तमिळ चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय नाव बनलं आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांचे चाहते विजय यांची देवासारखी पूजा करतात. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांच्या फॅन फॉलोईंगची प्रचिती सर्वांनाच आली होती. तमिळनाडूमध्ये सत्ताधारी द्रमुकच्या प्रशासनाविरोधातील रोष, नव्या पक्षाला संधी देण्याकडे कल तसंच महिलांचा विजयवरील विश्वास या मुद्द्यांसमोर उत्तर-दक्षिण वाद, हिंदी भाषावाद, द्राविडी अस्मिता हे द्रमुकचे प्रचाराचे मुद्दे फिके पडले.

Follow Us