Budget 2024 : शेती, रोजगारावर भर, तर आयकरातून सूट; मोदी 3.0 सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात मोठ्या घोषणांचा पाऊस?

यंदाचा अर्थसंकल्प 47 लाख 65 हजार 768 कोटींचा असणार आहे. आजच्या अर्थसंकल्पात नेमके काय असणार? कोणत्या भागासाठी काय तरतुदी असतील? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Budget 2024 : शेती, रोजगारावर भर, तर आयकरातून सूट; मोदी 3.0 सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात मोठ्या घोषणांचा पाऊस?
| Updated on: Jul 23, 2024 | 8:47 AM

Union Budget 2024-25 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन आज 23 जुलै रोजी सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प असणार आहे. सलग सातव्यांदा अर्थमंत्री निर्मला सीतारमन या अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदाचा अर्थसंकल्प 47 लाख 65 हजार 768 कोटींचा असणार आहे. आजच्या अर्थसंकल्पात नेमके काय असणार? कोणत्या भागासाठी काय तरतुदी असतील? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर देशात एनडीए सरकार स्थापन झालं. या सत्तास्थापनेनंतर संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारी 22 जुलैपासून सुरु झाले. हे अधिवेशन 22 जुलैपासून 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण सादर केले. या अहवालात देशातील कृषी क्षेत्र आणि रोजगार यावर जास्त भर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्याचेच प्रतिबिंब आज सादर होणाऱ्या अर्थ संकल्पावर दिसेल, असे बोललं जात आहे.

त्यासोबतच आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात महिला, तरुण, शेतकरी आणि गरीबांवर लक्ष केंद्रीत केलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासोबतच आजच्या अर्थसंकल्पातून आयकरदात्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासोबतच ५ ते १५ लाखापर्यंत उत्पन्न असलेल्यांना करात सूट मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही अर्थसंकल्पात मोठी तरतूद असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठ्या घोषणा

त्यासोबतच भांडवली नफा कराबाबत सरकार काही घोषणा करण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय असणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. मोदी 3.0 सरकार अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. लखपती दीदी आणि लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता आहे. देशात तीन कोटी लखपती दीदी करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. सध्या या योजनेअंतर्गत महिलांना प्रतिमहिना 1500 रुपयांची मदत दिली जात आहे.

निर्मला सीतारामन यांचा विक्रम

2019 मध्ये केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमन यांची भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन केलं आहे. तेव्हापासून, सीतारामन यांनी सलग सहा अर्थसंकल्प सादर केले आहेत. यापूर्वी सीतारमण यांनी 2019 आणि 2024 मध्ये दोन अंतरिम बजेट आणि चार पूर्ण बजेट सादर केले आहेत. यात यंदा फेब्रुवारीमध्ये सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पाचाही समावेश आहे. त्यापूर्वी माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी 6 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे.